भिवंडी, ता. २६ (वार्ताहर) : मतदानाच्या अधिकाराबाबत जागृती करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने ‘मत वाचवा, देश वाचवा’ जनआंदोलन अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारी (ता. २५) सुरुवात झाली. या अभियानांतर्गत २५ नोव्हेंबरपर्यंत शहरातील विविध प्रभाग, वस्त्या आणि परिसरांत मतदार जनजागृती चौपाल होणार असल्याचे माहिती काँग्रेसचे भिवंडी शहराध्यक्ष आबिद मुन्सफ खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्या निर्देशानुसार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १० ते २० ऑक्टोबरदरम्यान मतदानाचा घटनात्मक अधिकार, मतदार यादीतील नावांची पडताळणी आणि अभियानाचा प्रचार यावर भर देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात नागरिकांशी थेट संवाद साधून मतदार यादीतील नावांची तपासणी, चुकीच्या नोंदींबाबत जागृती आणि आवश्यक दुरुस्ती प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. या अभियानात सर्व गटाध्यक्ष, काँग्रेस पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी आणि समाजमाध्यम विभाग सहभागी होणार आहेत. २६ ऑक्टोबरला पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक, २७ ऑक्टोबरला मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी व कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, तर २८ ऑक्टोबरपासून मतदान केंद्रनिहाय जनजागृती आणि मतदार यादी पडताळणी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मतदारांच्या तक्रारी संकलित करून संबंधित निवडणूक नोंदणी अधिकारी किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडे नियमानुसार दाद मागण्यासाठी नागरिकांना मदत केली जाणार आहे. प्रत्येक पात्र मतदाराला यादीतील आपले नाव तपासण्यास प्रोत्साहित करणे आणि मतदानाच्या अधिकाराबाबत जागृती करणे, ही अभियानाची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे खान यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.