दिवाळीच्या स्वागतासाठी नवी मुंबई सज्ज
बाजारपेठेत आकर्षक रोषणाई आणि सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी
वाशी, ता. २६ (बातमीदार) ः दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असून, तिच्या स्वागताची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. यानिमित्त नवी मुंबईतील वाशी, ऐरोली, कोपरखैरणे, नेरूळ व सीबीडी बेलापूरसह विविध बाजारपेठा सजावटीच्या वस्तूंनी गजबजून गेल्या आहेत. यंदाच्या दिवाळीत पारंपरिक वस्तूंबबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंना नागरिकांची विशेष पसंती मिळत आहे.
शहरातील बाजारपेठांमध्ये पारंपारिक मातीचे दिवे, रंगीबेरंगी रांगोळी, कृत्रिम फुलांच्या माळा आणि आकाशकंदीलांपासून ते आधुनिक एलईडी रोषणाईपर्यंतचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. घराच्या प्रवेशद्वारासाठी कृत्रिम आंब्याची पाने, झुबकेदार फुलांचे हार, मणी आणि आरशांचे काम असलेली आकर्षक तोरणे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच, देवघर आणि बैठकीच्या खोलीसाठी आकर्षक फुलदाण्या, भिंतीवरील सजावटीच्या वस्तू, पितळी व मरोळ्याचे पाट उपलब्ध आहेत. खिडक्या, बाल्कनी आणि भिंती सजवण्यासाठी एलईडी दिव्यांच्या माळा, बदामाच्या आकारातील रोषणाई, सजावटीच्या वेगवेगळ्या डिझाइन्स आणि कँडल होल्डर यांना नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत.
यंदा काय आहे ट्रेंडिंगमध्ये?
यंदाच्या दिवाळी बाजारात आधुनिकतेची झलक पाहायला मिळत आहे. सेन्सॉरवर चालणारे दिवे, रंग बदलणारी रोषणाई आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे दिवे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. याशिवाय कागदी व कापडी लहान-मोठे स्टिकर्स, रांगोळीसोबत लावण्यासाठीचे स्टिकर्स आणि लक्ष्मीची पावले व शुभ-लाभच्या विविध डिझाइन्स उपलब्ध आहेत. व्यावसायिक आस्थापना आणि घरांसाठी टेबल डेकोर, सजावटीच्या फुलांचे कॅण्डल होल्डर आणि कमळाच्या आकारातील दिवे यांसारखे आधुनिक पर्यायदेखील मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले आहेत.
किमती आणि ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद
१ सजावटीच्या वस्तूंचे प्रकार, आकार आणि साहित्यानुसार त्यांच्या किमती ठरलेल्या आहेत. बाजारात साधे तोरण ८० ते ३०० रुपयांपर्यंत, रांगोळीचे रंग २० ते ८० रुपयांपर्यंत, तर आकाशकंदील व दिव्यांच्या माळा १०० ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच शुभेच्छा देणारे स्टिकर्स १०० रुपयांपासून पुढे मिळतात.
२ नोकरी आणि घरातील इतर कामांमुळे सजावटीसाठी फारसा वेळ मिळत नसल्याने अनेक नागरिक तयार रांगोळी, सजावटीचे स्टिकर्स आणि कृत्रिम फुलांच्या माळांना पसंती देत आहेत. कमी वेळेत घर सजवणे शक्य होत असल्यामुळे आणि दरवर्षी नवीन वस्तू खरेदी करण्यापेक्षा टिकाऊ व पुन्हा वापरता येतील अशा वस्तूंना नागरिक प्राधान्य देत असल्याचे विक्रेते सांगत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.