कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
तुर्भेमध्ये पाच वर्षांपासून ४१ कोटींचा उड्डाणपूल रखडला
तुर्भे, ता. २६ (बातमीदार) : ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे स्टोअर चौकात रस्ता ओलांडणाऱ्या ४५ वर्षीय महिलेचा भरधाव कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाला. सोमवारी (ता. २६) सकाळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे तुर्भे स्टोअर येथील धोकादायक चौकाचा आणि गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्गाची सुविधा नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे.
तुर्भे स्टोअर हा नवी मुंबईतील वर्दळीचा परिसर आहे. दररोज हजारो कामगार, विद्यार्थी आणि रहिवासी या सहापदरी महामार्गावरून ये-जा करतात. येथे पादचाऱ्यांसाठी स्कायवॉक किंवा सुरक्षित रस्ता ओलांडण्याची व्यवस्था नसल्याने अपघातांचा धोका कायम आहे.
४१ कोटींचा उड्डाणपूल रखडला
नवी मुंबई महापालिकेने २०१९ मध्ये तुर्भे स्टोअर येथे ५६० मीटर लांबीचा चारपदरी उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी दिली होती. या प्रकल्पासाठी सुमारे ४१ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला असून, महावीर रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला कामाचे कंत्राट देण्यात आले होते.
रस्त्याखालील एमआयडीसीची मलवाहिनी, आराखड्यातील त्रुटी आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे हे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून रखडले आहे. मध्यंतरी काम पूर्णपणे बंद होते. त्यानंतर आयआयटी मुंबईकडून नवीन आराखड्याला मंजुरी मिळाल्यावर काम पुन्हा सुरू झाले. मात्र प्रत्यक्षात अपेक्षित प्रगती झाली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
दहा वर्षांत २३ जणांचा मृत्यू
तुर्भे स्टोअर संघर्ष समितीच्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत या चौकात अपघातांत २३ जणांचा मृत्यू झाला असून, ५० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. नोव्हेंबर २०२४मध्ये नागरिकांनी संविधान दिनानिमित्त स्वाक्षरी मोहीम राबवून महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते; तरीही ठोस उपाययोजना झाल्या नसल्याची नाराजी नागरिक व्यक्त करीत आहेत.
या परिसरात सध्या वाहतूक एका मार्गिकेतून वळविण्यात आल्याने सकाळी आणि संध्याकाळी मोठी वाहतूक कोंडी होते. ठाण्याहून बेलापूरच्या दिशेने जाणारी वाहने वेगाने येत असल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या अपघातप्रकरणी तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.