राजकीय टीका धोरणांवर करा; वैयक्तिक पातळीवर जाऊ नका
खरगे यांच्या वक्तव्याचा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून निषेध
कल्याण, ता. २६ (वार्ताहर) : राजकीय विरोध करताना वैयक्तिक पातळीवर जाऊन अपमानास्पद भाषा वापरणे योग्य नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला. तसेच, या प्रकरणावर गांधी परिवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
डॉ. शिंदे यांनी समाजमाध्यमावरील ‘एक्स’वरून आपली भूमिका मांडली. राजकारणात वैचारिक मतभेद आणि धोरणांवर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, टीका करताना सभ्यता आणि संयमाच्या मर्यादा पाळणे आवश्यक आहे. राजकीय नेत्याच्या दिवंगत आई-वडिलांना लक्ष्य करणे हे राजकीय विरोधाच्या मर्यादांना धरून नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा आणि लोकशाहीतील संकेतांचे भान ठेवले पाहिजे, असेही शिंदे यांनी नमूद केले. राजकीय मतभेदांचे रूपांतर वैयक्तिक द्वेषात होऊ नये. सार्वजनिक जीवनात जबाबदारीने वक्तव्य करणे ही प्रत्येक राजकीय नेत्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले.
खरगे यांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज असल्याचे सांगत शिंदे यांनी गांधी परिवाराच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला. लोकशाहीतील सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणाऱ्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेतृत्व गप्प का आहे, असा सवाल त्यांनी केला
राजकीय पक्षांनी वैयक्तिक टीकेपेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे आणि सार्वजनिक चर्चेचा स्तर टिकवून ठेवावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले. या प्रकरणी काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.