कल्याण, ता. २८ (बातमीदार) : रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील पादचारी पुलावर बेकायदा दुकाने थाटणाऱ्या फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परफ्युम आणि मोबाईल कव्हर विक्रीच्या बहाण्याने प्रवाशांची उघडउघड लूट सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी लोहमार्ग पोलिस, स्थानिक पोलिस आणि पालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल करत कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
पादचारी पुलावरील फेरीवाले सुरुवातीला १०० रुपयांत वस्तू देण्याचे ओरडून सांगून प्रवाशांना आकर्षित करतात. मात्र, प्रवासी खरेदीसाठी गेल्यानंतर त्याच वस्तूचे तब्बल १,८०० ते २,००० रुपये जबरदस्तीने उकळले जात आहेत. एखाद्या ग्राहकाने अथवा प्रवाशाने जादा पैसे देण्यास किंवा वस्तू घेण्यास नकार दिल्यास त्याला अश्लील शिवीगाळ करून धमकावले जाते; तसेच काही प्रसंगांत मारहाणीचे प्रकारही घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फेरीवाल्यांच्या या गुंडगिरीमुळे घाबरलेले प्रवासी मुकाट्याने मागणी तशी रक्कम देऊन स्वतःची सुटका करून घेत आहेत. या दिवसाढवळ्या चालणाऱ्या लुटीमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने आणि कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे या समस्येकडे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.