दुरुस्तीअभावी ‘संवेदना’ची दुरवस्था
उद्यानावर कोट्यवधींचा खर्च; विशेष मुलांच्या सुविधांकडे दुर्लक्ष
नेरूळ, ता. २७ (बातमीदार) : विशेष मुलांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, दिव्यांगांना खेळता-बागडता यावे आणि निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा मिळावा, या उद्देशाने सानपाडा सेक्टर १० येथे उभारण्यात आलेल्या ‘संवेदना’ उद्यानाची देखभाल-दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून विकसित केलेल्या या उद्यानातील पाण्याचे हौद कोरडे पडले आहेत, अनेक दिवे बंद असून, काही गायब झाले आहेत. खेळण्यांच्या परिसरात खड्डे पडले आहेत, तर प्रसाधनगृहाला टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे विशेष मुलांसाठी उभारलेल्या या उद्यानातील सुविधाच कुचकामी ठरत असल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तुर्भे विभाग कार्यालयासमोरील सानपाडा सेक्टर १० येथील हे उद्यान विशेष मुलांसह दिव्यांग व्यक्तींना विविध अनुभव घेता यावेत, या संकल्पनेतून विकसित करण्यात आले होते. उद्यानात त्यांच्या गरजा लक्षात घेऊन खेळणी, व्यायामाची साधने आणि मनोरंजनाच्या विविध सुविधा उभारण्यात आल्या, मात्र या सुविधांची नियमित देखभाल होत नसल्याने उद्यानाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे.
उद्यानात व्हीलचेअर झोपाळा, वाळूचा हौद, बोगदा, आकर्षक हिरवळ, तसेच दगड, लाकूड, लाद्या आणि गोटे यांचा वापर करून तयार केलेला मार्ग आहे. याशिवाय सापशिडी, स्किपिंग टब, बेल ट्री, फुली-गोळ्याचा खेळ, सेल्फी फ्रेम, बुद्धिबळाच्या चौकटी आणि सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक अशा सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र जागा आणि लहान मुलांसाठी खेळणीही बसविण्यात आली आहेत, मात्र या सुविधांची निगा राखली जात नसल्याने त्यांचा वापर करताना अडचणी येत आहेत.
दरम्यान, उद्यानातील समस्यांकडे महापौर आणि महापालिका आयुक्तांनी तातडीने लक्ष द्यावे. उद्यानाची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी आणि देखभालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हौद कोरडे, दिवे गायब
उद्यानात तीन छोटे पाण्याचे हौद तयार करून त्यात कमळासारख्या तरंगत्या वनस्पती लावण्यात आल्या होत्या, मात्र सध्या हे तिन्ही हौद कोरडे पडले आहेत. उद्यानातील अनेक विद्युत दिवे गायब झाले असून, काही दिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी परिसरात अंधार पसरतो. उद्यानात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. लहान मुलांच्या खेळण्यांच्या परिसरात खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने उभारलेल्या उद्यानातच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
प्रसाधनगृहाला टाळे
उद्यानातील प्रसाधनगृह बंद ठेवण्यात आले असून, त्याला टाळे लावण्यात आले आहे. विशेषतः दिव्यांग व्यक्ती आणि विशेष मुलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ व वापरण्यायोग्य प्रसाधनगृह उपलब्ध असणे आवश्यक आहे, मात्र उद्यानात ही सुविधाच बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या उद्यानातील मूलभूत सुविधांची अशी अवस्था असल्याने महापालिकेच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.