नवी मुंबईत विकासकामांना गती
जलवाहिन्या, गॅस पाइपलाइन, गटार दुरुस्तीची कामे सुरू
वाशी, ता. २७ (बातमीदार) : पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेल्या खोदकामांना परवानगी मिळाल्यानंतर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पुन्हा विकासकामांचा वेग वाढला आहे. शहरातील दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ आणि बेलापूर या विभागांत रस्त्यांची खोदाई, जुन्या जलवाहिन्या बदलणे, गॅस व वीजवाहिन्या टाकणे आणि गटारांची दुरुस्ती, अशी विविध कामे सुरू झाली आहेत. आगामी काळात नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेने विविध कामांना प्राधान्य दिले आहे.
महापालिकेच्या नियमानुसार, १५ मेपासून खोदकामासाठी परवानगी देणे बंद केले जाते, तर २५ मेपासून प्रत्यक्ष खोदकाम पूर्णपणे थांबवले जाते. ३० सप्टेंबरपर्यंत पावसाळी कालावधीत खोदाईवर निर्बंध असतात. पावसामुळे खोदलेल्या रस्त्यांवर खड्डे पडणे, वाहतुकीला अडथळे निर्माण होणे आणि अपघातांचा धोका वाढणे, या शक्यतांमुळे हा निर्णय घेतला जातो. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा कामांना परवानगी देण्यात आल्याने शहरात विविध ठिकाणी खोदकामे सुरू झाली आहेत.
सध्या केवळ रस्ते दुरुस्तीच नव्हे, तर जुन्या जलवाहिन्या बदलणे, गॅस पाइपलाइन टाकणे, पदपथांची कामे आणि गटारांची दुरुस्तीही केली जात आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत काही प्रकल्पांची कामे सुरू असून, ऐरोली-कटाई उन्नत मार्ग आणि ऐरोली-घणसोली मार्गाच्या कामांनाही गती मिळाली आहे. पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थेतील सुधारणा करण्यावरही भर दिला जात आहे.
वाहतूक सुरक्षेची खबरदारी
खोदकामांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये आणि अपघात टाळता यावेत, यासाठी कामांच्या ठिकाणी सूचना फलक, बॅरिकेड्स आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था ठेवण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. पावसाळ्यानंतर विकासकामांना गती देण्याच्या नियोजनानुसार शहरातील विविध विभागांत कामे सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या अभियंत्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.