मुरूडमध्ये पाणीटंचाईचे सावट
जलसाठे घटल्याने काटकसरीचे आवाहन
मुरूड, ता. २७ (बातमीदार) : यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने मुरूड तालुक्यातील नद्या, तलाव, विहिरी आणि धरणांमधील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे आगामी काळात ग्रामीण तसेच शहरी भागात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संभाव्य संकट टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुरूड-जंजिरा नगरपरिषदेकडून करण्यात येत आहे.
मुरूड तालुक्यात दरवर्षी सरासरी दोन हजार ८०० ते तीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो, मात्र यंदा हे प्रमाण दोन हजार ३८० मिलिमीटरवर थांबले आहे. सुमारे ५०० मिलिमीटर पावसाची तूट असल्याने जलस्रोतांवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिल्याने भातशेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील तीन हजार २०० हेक्टर भातक्षेत्रापैकी सुमारे ६० टक्के क्षेत्र बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे. हळव्या भाताचे पीक वाळून गेले असून, उर्वरित पिकांनाही पाण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात सार्वजनिक नळांमधून पाणी वाया जाणे, अनधिकृत मोटारींचा वापर आणि पाइपलाइनमधील गळती यामुळे उपलब्ध पाण्याचे असमान वितरण होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठ्याचे नियोजन करून अपव्यय रोखण्याची गरज आहे.
पाणीबचतीसाठी जनजागृती
मुरूड-जंजिरा नगर परिषदेकडून शहरात दवंडी देऊन तसेच फलक लावून नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन केले जात आहे. नळ सुरू ठेवून पाणी वाया घालवू नये, वाहन व अंगण धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, घरातील नळ व पाइपलाइनची गळती त्वरित दुरुस्त करावी आणि शक्य तेथे पाण्याचा पुनर्वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर केल्यास संभाव्य टंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.