ऑपरेशन ‘सिंदूर’ पोस्ट प्रकरण
तारुण्यातील अतिउत्साहातून चूक
उच्च न्यायालयाचे निरीक्षण; पुण्यातील विद्यार्थिनीविरुद्धचा गुन्हा रद्द
सकाळ वृत्तसेवा,
मुंबई, ता. २७ : ऑपरेशन ‘सिंदूर’बाबत समाजमाध्यमावर पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यातील २० वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीविरुद्ध दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. २७) रद्द केला. तरुण वयातील अतिउत्साहातून तिच्याकडून चूक झाली असावी, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
मूळची काश्मीरची असलेली ही विद्यार्थिनी पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेते आहे. विद्यार्थिनीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तिने पोस्ट पुन्हा शेअर केल्यानंतर ती हटवून माफी मागितली होती. तरुण वयातील अतिउत्साहातून ही चूक झाली असावी, असे न्या. मिलिंद जाधव यांनी म्हटले. तिचे भविष्य आणि करिअर लक्षात घेऊन तिला संधी देणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. विद्यार्थिनीला यापूर्वीच तुरुंगवास भोगावा लागला आहे. त्यामुळे तिच्या शैक्षणिक आणि भविष्यातील कारकिर्दीवर परिणाम होऊ शकतो, असे न्यायालयाने नमूद केले. पोस्ट पुन्हा शेअर करण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही पुरावा नसल्याने न्यायालयाने तिच्याविरुद्धची फौजदारी कारवाई रद्द केली.
.......
भावना दुखावणे खटल्याचा आधार नाही
धर्म आणि धार्मिक भावनांशी संबंधित मजकूर जबाबदारीने हाताळला पाहिजे; मात्र एखादा मजकूर अप्रिय वाटतो किंवा त्यामुळे भावना दुखावण्याची शक्यता आहे, एवढ्याच कारणावरून फौजदारी खटला चालवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
.......
प्रकरण काय?
विद्यार्थिनीने ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. चूक लक्षात आल्यानंतर तिने पोस्ट हटवून माफी मागितली. तरीही पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई बेकायदा असल्याचा दावा करत तिने वकील फरहाना शाह यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली. मूळची काश्मीरची असलेली ही विद्यार्थिनी पुण्यातील सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. अटकेनंतर तिला महाविद्यालयातून काढल्याबद्दल उच्च न्यायालयाने मे महिन्यात पोलिस आणि महाविद्यालयाला फटकारले होते. तसेच तिला जामीन देऊन परीक्षा देण्याची परवानगीही दिली होती. त्यानंतर तिने गुन्हा रद्द करण्यासाठी पुन्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.