‘मेट्रो १२-अ’ प्रकल्प
साडेतीन वर्षांत पूर्ण करा!
मुख्यमंत्री : मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने आज मानपाडा-काटई नाका ते तळोजा ‘मेट्रो १२-अ’ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. १८.४० किमीच्या या मेट्रो मार्गिकेसाठी सुमारे १३ हजार ८५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मेट्रो मार्गिकेसोबत एकात्मिक उड्डाणपुलाचीही उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम पुढील साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते. ‘मेट्रो १२-अ’मुळे औद्योगिक आणि लॉजिस्टिक केंद्रांशी संपर्क वाढण्याबरोबरच कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई शहरांमधील वाहतूक अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
--
असा आहे प्रकल्प
- संपूर्ण उन्नत असलेल्या मेट्रो मार्गिकेवर १२ स्थानके प्रस्तावित
- प्रकल्पात ६.९३ किमीचा चारपदरी आणि ८.६९ किमीचा सहापदरी उड्डाणपूल समाविष्ट
- दररोज ४.७४ लाख प्रवासी क्षमता
- काटई नाका येथे मेट्रो मार्गिका १२ व बुलेट ट्रेन जोडमार्ग, काटई नाका ते कल्याण फाटादरम्यान मेट्रो मार्गिका १४ आणि अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो मार्गिका १ शी जोडणी
- सर्व स्थानकांवर फीडर बससेवाही प्रस्तावित
- रस्तेमार्गाच्या तुलनेत ४० ते ५० टक्क्यांनी प्रवास वेळ कमी
---
एमएमआरडीए विशेष नियोजन प्राधिकरण
मेट्रो मार्गिका आणि एकात्मिक उड्डाणपुलाच्या अंमलबजावणीसाठी एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यास समितीने मान्यता दिली. प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रातील निश्चित शासकीय जमिनी प्रकल्प विकास व निधी उभारणीसाठी प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यासही या वेळी मंजुरी देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.