अंबरनाथ, ता. २८ (वार्ताहर) : संरक्षण क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयुध निर्माणी अंबरनाथ येथे ‘कॉपर अँड कॉपर अॅलॉय टेक्नॉलॉजी फॉर डिफेन्स अॅप्लिकेशन्स’ या विषयावर राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. या परिषदेत देशातील विविध नामांकित संशोधन संस्था, औद्योगिक आस्थापना आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग घेत तांबे व तांब्याच्या मिश्रधातूंच्या संरक्षण क्षेत्रातील उपयुक्ततेवर विचारमंथन केले.
परिषदेचे उद्घाटन आयुध निर्माणी अंबरनाथचे कार्यकारी संचालक बी. व्ही. राव, एमटीपीएफ अंबरनाथचे मुख्य महाव्यवस्थापक अतुल खरे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी यंत्र इंडिया लिमिटेडचे संचालक (ऑपरेशन्स) तसेच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे विजय कुमार अय्यर यांनी ऑनलाइन माध्यमातून मार्गदर्शन केले. परिषदेत डीएमआरएल, एनएमआरएल, हिंदाल्को, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), आयआयटी चेन्नई, आयआयटी रोपर आणि यंत्र इंडिया लिमिटेडसह विविध संस्थांचे शास्त्रज्ञ, अधिकारी व प्रतिनिधी सहभागी झाले. काही तज्ज्ञांनी ऑनलाइन माध्यमातूनही सहभाग नोंदवला. अध्यक्षीय भाषणात बी. व्ही. राव यांनी संरक्षण उपकरणे आणि दारूगोळ्याच्या निर्मितीमध्ये तांबे व मिश्रधातूंचे महत्त्व अधोरेखित केले. संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना साकारण्यासाठी विविध संस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. परिषदेत तांबे व मिश्रधातूंचे नवे उपयोग, संरक्षण उत्पादनातील तांत्रिक आव्हाने आणि त्यावरील संभाव्य उपायांवर चर्चा झाली. या उपक्रमामुळे संरक्षण क्षेत्रातील संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि औद्योगिक सहकार्याला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.