दिवाळीवर महागाईचे सावट
बाजारभाव वाढले; सणाच्या खरेदीला कात्री
कासा, ता. २८ (बातमीदार) : दिवाळीचा सण उंबरठ्यावर असतानाच महागाईने सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण घातले आहे. तांदूळ, डाळी, खाद्यतेल आणि भाजीपाल्याच्या वाढत्या दरांमुळे घरखर्चाचे गणित बिघडले असून, फराळ करायचा की रोजच्या खर्चाची तजवीज, असा प्रश्न गृहिणींसमोर उभा राहिला आहे. त्यातच यंदा पावसाच्या कमतरतेमुळे भातपिकाचे उत्पादन घटल्याने ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना महागाईचा दुहेरी फटका बसत आहे.
बाजारात तूरडाळ आणि चणाडाळीच्या दरात प्रतिकिलो २० ते २५ रुपयांची वाढ झाली आहे. तूरडाळ १७५ रुपये, बेसन १२० रुपये, तर तांदूळ ६५ ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. खाद्यतेलाचे दरही प्रतिलिटर १५० रुपयांपुढे गेले आहेत. कांदा, लसूण, बटाटा आणि टोमॅटोसह भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींमुळे रोजच्या स्वयंपाकाचा खर्चही आवाक्याबाहेर जात आहे. परिणामी दिवाळीची खरेदी आणि फराळाच्या तयारीला कात्री लावण्याची वेळ अनेक कुटुंबांवर आली आहे.
भातपिकाचे नुकसान; सणाचा खर्च भागवायचा कसा?
ग्रामीण भागात भातविक्रीतून मिळणारे उत्पन्न दिवाळीच्या खर्चासाठी महत्त्वाचे ठरते. मात्र, यंदा पावसाच्या कमतरतेमुळे भाताचे उत्पादन अपेक्षेप्रमाणे झालेले नाही. उत्पन्न घटले असताना बाजारभावातील वाढ कायम असल्याने शेतकरी कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ‘‘रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूचे दर वाढले आहेत. यंदा भाताचे पीकही कमी आल्याने दिवाळीचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न आहे,’’ अशी व्यथा ईश्वर काकड यांनी व्यक्त केली. सणाचा उत्साह आणि खिशाला बसणारी महागाईची झळ, अशा कात्रीत सर्वसामान्य अडकले आहेत. वाढत्या खर्चामुळे यंदाची दिवाळी मोठ्या उत्साहात नव्हे, तर काटकसरीने साजरी करण्याची वेळ अनेक कुटुंबांवर आली आहे.