बीएमटीसी कामगार मोबदल्याच्या प्रतीक्षेत!
५०० कामगारांनाच १० लाखांचे धनादेश; वर्ष उलटूनही उर्वरित कामगारांना प्रतीक्षा
तुर्भे, ता. २९ (बातमीदार) : सिडकोच्या बंद पडलेल्या बीएमटीसी परिवहन सेवेतील माजी कर्मचाऱ्यांचा ४३ वर्षांनंतही संघर्ष सुरूच आहे. एकूण एक हजार ५८७ पात्र कामगारांपैकी केवळ ५०० कामगारांनाच प्रत्येकी १० लाखांचे धनादेश हस्तांतरित केले असून, उर्वरित एक हजार ८७ कामगार अजूनही मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात कामगार संघटनेने माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून उत्तर मागितले असता सिडकोकडून प्रतिसाद न मिळाल्याने कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नवी मुंबईच्या उभारणीच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सिडकोने बीएमटीसी परिवहन सेवा सुरू केली होती, मात्र आर्थिक अडचणींमुळे ही सेवा १९८४ मध्ये बंद करण्यात आली. त्यानंतर या सेवेत काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचा आणि आर्थिक मोबदल्याचा प्रश्न निर्माण झाला. आपल्या हक्काच्या मोबदल्यासाठी माजी कामगारांनी अनेक वर्षे आंदोलने, निवेदने आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. तब्बल ४३ वर्षांच्या संघर्षानंतर कामगारांना प्रत्येकी १० लाख रुपये अथवा व्यावसायिक गाळा देण्याचा निर्णय झाला. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर काही कामगारांना धनादेशही देण्यात आले, मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मोबदला वाटपाची प्रक्रिया नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे, उर्वरित कामगारांना धनादेश देण्यास विलंब का होत आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागणार आहे, याची माहिती मिळवण्यासाठी कामगार संघटनेने माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला. मात्र, अद्याप या अर्जाला उत्तर मिळाले नसल्याचा दावा संघटनेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मोबदला वाटपाबाबत पारदर्शकता आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.