उल्हासनगर, ता. २९ (वार्ताहर) : चिमुकल्यांची भूक भागवणाऱ्या महिलांवरच आता आर्थिक उपासमारीची वेळ आली आहे. उल्हासनगरातील २१७ अंगणवाड्यांना पोषण आहार पुरवणाऱ्या ४५ महिला बचत गटांची मार्चपासूनची देयके थकल्याने महिलांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आहार शिजवण्यासाठी काहींना दागिने मोडावे लागत असून, आठ दिवसांत थकीत रक्कम न मिळाल्यास हजारो बालकांचा पोषण आहार बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे.
उल्हासनगर शहरातील २१७ अंगणवाड्यांमधील तब्बल पाच हजार ४७४ बालकांना ताजा आणि गरम पोषण आहार पुरवणाऱ्या ४५ महिला बचत गटांवर आर्थिक संकट कोसळले आहे. मार्चपासून पोषण आहाराची देयके थकल्याने या महिलांना स्वतःच्या खिशातून कच्चा माल, गॅस सिलिंडर, वाहतूक आणि स्वयंपाकाचा खर्च भागवावा लागत आहे. विशेष म्हणजे, चिमुकल्यांची भूक भागवण्यासाठी काही महिलांवर स्वतःचे दागिने मोडण्याची वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे. बाल विकास प्रकल्प विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी १७५ क्विंटल गहू आणि १६७ क्विंटल तांदूळ पुरवला जातो. मात्र, अनेक महिन्यांपासून देयके रखडल्याने बचत गटांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे.
आहारपुरवठा बंद करण्याचा इशारा
येत्या आठ दिवसांत थकीत देयके मंजूर न झाल्यास पुढील आठवड्यापासून आहारपुरवठा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे हजारो चिमुकल्यांच्या पोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने थकीत देयके अदा करावीत आणि आहारपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी होत आहे.
बालविकास विभागाच्या निर्णयाकडे लक्ष
थकीत रक्कम मिळावी, यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. आर्थिक कोंडी असह्य झाल्याने अंगणवाडी क्रमांक ४५, ७७, १०७, ८७, ८८ आणि ६३ येथे पोषण आहाराचा पुरवठा बंद करण्याची परवानगी सरकारकडे मागण्यात आली आहे. महिला बचत गटांच्या या इशाऱ्यामुळे आता बालविकास विभाग कोणती पावले उचलणार, याकडे लक्ष लागले आहे.
मार्च-एप्रिलची थकीत देयके लवकरच मिळणार!
महिला बचत गटांच्या पोषण आहाराच्या थकीत देयकांबाबत आमच्या कार्यालयाकडून सर्व मंजूर बिले सरकारकडे पाठविण्यात आली आहेत. मार्च आणि एप्रिलची देयके लवकरच वितरित केली जाणार आहेत. संबंधित देयकांची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू असून, महिला बचत गटांना थकीत रक्कम मिळावी, यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येत असल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी नमिता शिंदे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.