गोवंडी भयमुक्त करा!
रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची पोलिसांकडे मागणी
चेंबूर, ता. २९ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज नगर, बैंगनवाडी आणि गोवंडी परिसरातील वाढती गुंडगिरी, चरस-गांजाची विक्री तसेच नशेखोरांमधील वादांतून होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत, गोवंडी भयमुक्त करण्यासाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.
परिसरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. रात्री १० नंतर अत्यावश्यक सेवा वगळता हॉटेल आणि चहाच्या टपऱ्या बंद ठेवाव्यात, पोस्ट ऑफिसशेजारील बंद पडलेली जुनी पोलिस चौकी तातडीने सुरू करावी, तसेच मोहल्ला कमिटीची फेररचना करून त्यात सक्षम आणि जबाबदार नागरिकांचा समावेश करावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
या वेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे माजी मुंबई उपाध्यक्ष विशाल सुप्रिया विजय मोरे (मिळंदकर), रिपब्लिकन सेनेचे माजी तालुकाध्यक्ष अशोक जाधव, बौद्धजन पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजीनगर मानखुर्द-चेंबूर विभागाचे नेते संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, तसेच छत्रपती शिवाजी महाराज नगर-बैंगनवाडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे माजी अध्यक्ष शुभम सोनवणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.