सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : मध्य रेल्वेवरील परळ ते कल्याणदरम्यान धावणाऱ्या ‘रेल्वे वर्कमन स्पेशल’ लोकलमधील रिकाम्या जागांचा उपयोग सर्वसामान्य प्रवाशांसाठी करावा, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. गर्दीच्या वेळी ही लोकल अंशतः रिकामी धावत असताना दुसरीकडे प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे या लोकलमधील काही डबे सर्वसामान्य प्रवासी, महिला आणि दिव्यांगांसाठी खुले करण्याची मागणी त्यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे पत्राद्वारे केली आहे.
२६ ऑक्टोबरला मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले होते. विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली असताना ‘रेल्वे वर्कमन स्पेशल’ धावत होती, मात्र या लोकलचे दरवाजे आणि खिडक्या बंद असल्याने स्थानकांवर ताटकळत उभ्या असलेल्या प्रवाशांना गाडीत प्रवेश करता आला नाही, असा मुद्दा म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. एका बाजूला प्रवाशांची गैरसोय होत असताना उपलब्ध रेल्वे सुविधांचा वापर करता न येणे, ही बाब त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
मध्य रेल्वेकडून दररोज दुपारी सुमारे ४.०५ वाजता परळ स्थानकातून कल्याणच्या दिशेने ‘रेल्वे वर्कमन स्पेशल’ चालवली जाते. ही लोकल प्रामुख्याने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी राखीव आहे. मात्र, या गाडीतील उपलब्ध क्षमतेचा पूर्ण वापर होत नसल्याने तिचा काही प्रमाणात सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपयोग करता येऊ शकतो, असे म्हस्के यांनी पत्रात नमूद केले आहे.