मेंढपाळांची कोकणाकडे भटकंती
पर्जन्यमानातील घट अन् चाऱ्याची चिंता; पारंपरिक व्यवसायापुढे नवे संकट
मुरूड, ता. २९ (बातमीदार) : राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पाणी आणि चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी घाटमाथ्यावरील मेंढपाळांनी कोकणात स्थलांतर सुरू केले आहे. विजयादशमीचा सण साजरा केल्यानंतर भोर, लोणंद, पुणे आणि सातारा परिसरातून शेळ्या-मेंढ्यांचे कळप आणि कुटुंबकबिल्यासह मेंढपाळ मुरूड परिसरात दाखल झाले आहेत.
मेंढपाळ समाजाची मैलोनमैल भटकंती ही जीवनशैलीच आहे. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता ते जनावरांचे संगोपन करतात. शेतात मुक्काम करण्यापूर्वी जमिनीच्या मालकाकडून पैसे आणि धान्य घेतले जाते. त्याबदल्यात शेळ्या, मेंढ्या आणि घोड्यांच्या मलमूत्रातून शेतजमिनीला नैसर्गिक खत मिळते. त्यामुळे भातपिकाच्या वाढीस मदत होते. या व्यवहारातून शेतकरी आणि मेंढपाळ या दोघांनाही फायदा होतो.
मेअखेर किंवा जूनच्या सुरुवातीला पावसाळ्यापूर्वी हे मेंढपाळ तंबू आणि सामान आवरून पुन्हा घाटमाथ्याकडे परततात. मुंबई-पुणे महामार्गावरून शिस्तबद्धपणे जाणारे मेंढ्यांचे कळप नागरिकांचे लक्ष वेधून घेतात, मात्र कोकणातील भातशेतीचे घटते क्षेत्र, वाढता मजुरीखर्च आणि मजुरांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांकडून कितपत सहकार्य मिळेल, याबाबत मेंढपाळ साशंक आहेत. मेंढ्यांच्या लोकरीसह शेळ्या-मेंढ्यांच्या विक्रीतूनही त्यांना उत्पन्न मिळते.
पावसाअभावी उदरनिर्वाहाचे आव्हान
मुरूडजवळील मजगाव येथे मुक्कामाला असलेले लोणंद येथील मेंढपाळ दामोदर शिंदे आणि बबन शिंदे यांनी यंदा कोकणातही पर्जन्यमान कमी असल्याने चिंता व्यक्त केली. चारा-पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांचे सहकार्य यावर त्यांच्या पारंपरिक व्यवसायाचे भवितव्य अवलंबून आहे. उघड्यावर पाल ठोकून सतत प्रवास करणाऱ्या या मेंढपाळांना यंदाचा हंगाम कसा जाईल, याची काळजी लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.