सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या नऊ महिन्यांपासून रखडलेल्या ठाणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांसह स्थायी, परिवहन आणि अन्य विषय समित्यांच्या निवडीला अखेर मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर १६ नोव्हेंबरपासून सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू होणार असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात समित्यांच्या सभापतींच्या निवडणुका होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या महत्त्वाच्या समित्यांवरील राजकीय सत्तासमीकरणे लवकरच स्पष्ट होणार आहेत.
ठाणे महापालिकेतील विविध समित्यांची स्थापना आणि स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती नऊ महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेवर तसेच राजकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. याप्रकरणी सागर कदम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर १२ ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती गिरीश कुळकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्वीकृत नगरसेवक, परिवहन समिती, स्थायी समिती आणि अन्य महत्त्वाच्या समित्या आठ आठवड्यांच्या आत स्थापित करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाच्या आदेशामुळे रखडलेल्या निवड प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली.
नोव्हेंबरमध्ये सदस्य निवड, डिसेंबरमध्ये सभापती
न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिका प्रशासनाने निवड प्रक्रियेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार १६ नोव्हेंबरनंतर स्वीकृत नगरसेवकांसह विविध समित्यांच्या सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आठवडाभरात यापूर्वी तहकूब झालेली महासभा घेऊन सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. सदस्य निवडीनंतर त्याबाबत कोकण विभागीय आयुक्तांना कळविण्यात येईल. त्यानंतर स्थायी, परिवहन आणि अन्य समित्यांच्या सभापती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेनुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सभापती निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे, मात्र निवडणुकांच्या तारखांबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
स्थायी समितीच्या एका जागेवरून चुरस
महापालिकेच्या आर्थिक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्थायी समितीतील १६ सदस्यांच्या संभाव्य पक्षीय संख्याबळावरूनही राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. संभाव्य गणितानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नऊ, भाजपचे तीन, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा प्रत्येकी एक सदस्य असू शकतो. या संभाव्य गणितानुसार एका जागेचे वाटप अद्याप अनिश्चित आहे. ही जागा मिळविण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.