‘दुःखद घटनेचे राजकारण दुर्दैवी’ः एकनाथ शिंदे
कायदा-सुव्यवस्था बिघडविल्यास कठोर कारवाईचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून ठाण्यात सुरू असलेल्या आंदोलनांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला. पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखद घटनेचे राजकारण करणे दुर्दैवी असल्याचे सांगतानाच, आंदोलनांच्या नावाखाली जाळपोळ, दगडफेक आणि वाहतूक रोखून नागरिकांना वेठीस धरणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही शिंदे यांनी दिला. तसेच विरोधकांना उठता-बसता एकनाथ शिंदेच दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोगलांना जसे धनाजी-संताजी दिसायचे, तशी काही जणांची अवस्था झाली आहे,” अशा शब्दांत शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
पूर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे म्हणाले, की घटनेच्या पहिल्याच दिवशी पोलिस आयुक्तांशी संपर्क साधून निष्पक्ष तपासाच्या सूचना दिल्या होत्या. कोणालाही पाठीशी घालण्याचे कारण नाही. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, शस्त्रेही जप्त केली आहेत. तपास सुरू असताना पोलिसांवर दबाव आणणे किंवा जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. पोलिसांना निर्भयपणे तपास करू दिला पाहिजे. पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असून, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. आंदोलनादरम्यान बाहेरून आलेल्या लोकांकडून शहरातील शांतता भंग केली जात असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. मंगळवारी रात्री जाळपोळ, महामार्ग रोखणे, नौपाडा परिसरात आंदोलन, पोलिसांवर दगडफेक आणि बाटल्या फेकण्याचे प्रकार घडले. यात पोलिस कर्मचारी जखमी झाले. एका दुःखद घटनेच्या आधारे राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न होत असल्याने शांतताप्रिय ठाणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले.
मीनाक्षी यांच्या राजीनाम्यावर भाष्य
महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवरही शिंदेंनी भूमिका स्पष्ट केली. पूर्णेकर हत्या प्रकरणाशी वारंवार नाव जोडले जात असल्याने पक्षाला त्रास होत असल्याची भावना मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामापत्रात व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधकांना प्रत्युत्तर
शेतकऱ्यांना दिलेली पाच हजार रुपयांची मदत ही केवळ तातडीची मदत असून, दुष्काळाच्या काळात मिळणाऱ्या शैक्षणिक शुल्कातील सवलतींसह अन्य लाभही दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार आणि शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
युतीधर्म पाळल्याचा दावा
विधान परिषद निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना शिवसेनेने नेहमीच युतीधर्म पाळल्याचे शिंदे यांनी सांगितले. शिवसेना आणि भाजप यांच्यात चार ठिकाणी युती होती, तर पुणे मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत आणि भाजपच्या उमेदवारामध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्यामुळे युतीधर्म पाळण्याची शिवसेनेची भूमिका कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.