नवी मुंबईत किल्ले बांधणी स्पर्धा
महापौर चषकासाठी ३० हजारांचे प्रथम पारितोषिक; शालेय आणि खुल्या गटांचा समावेश
नेरूळ, ता. ३० (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ‘नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. गड-किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन, दुर्गसंवर्धनाबाबत जनजागृती आणि बालकांसह युवकांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्पर्धेत मातीच्या साहाय्याने ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
ही स्पर्धा नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी खुली असून, शालेय आणि खुला असे दोन गट करण्यात आले आहेत. किल्ल्यांची रचना, ऐतिहासिक संदर्भ, कल्पकता आणि सादरीकरण या निकषांवर स्पर्धकांच्या कलाकृतींचे मूल्यमापन केले जाणार आहे.
खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी ३० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २० हजार आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. शालेय गटात अनुक्रमे २५ हजार, २० हजार आणि १० हजार रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय दोन्ही गटांत प्रत्येकी तीन उत्तेजनार्थ पारितोषिके असून, प्रत्येक विजेत्याला पाच हजार रुपये दिले जातील. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रकही देण्यात येणार आहे.
नोंदणीची माहिती लवकरच
महापौर सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, त्यासंबंधीची सविस्तर माहिती महानगरपालिकेकडून जाहीर केली जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश कान्हा म्हात्रे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.