सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : स्टार्टअपच्या नव्या संधी, करिअरविषयक मार्गदर्शन, आधुनिक आरोग्य तंत्रज्ञान आणि हॅलोविनचा जल्लोष अशा विविध उपक्रमांची मेजवानी ठाण्यातील तरुणाईला अनुभवता येणार आहे. सिद्धांत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जुनून ठाणे युवा महोत्सवा’ला उद्या (ता. ३१)पासून सुरुवात होत असून, तीन हात नाका येथील बाळासाहेब ठाकरे कलादालनात दोन दिवस हा महोत्सव रंगणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह करिअर आणि उद्योजकतेच्या नव्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी हा महोत्सव पर्वणी ठरणार आहे.
शनिवारी सकाळी १० वाजता डॉ. रेवती श्रीनिवासन यांच्या हस्ते महोत्सवाची सुरुवात होणार असल्याची माहिती सिद्धांत प्रतिष्ठानच्या साधना प्रधान यांनी दिली. सकाळी ११ वाजता डॉ. जो अल्वारेस यांच्या ‘इटर्नल ठाणे’ या विशेष सादरीकरणातून शहराचा ऐतिहासिक वारसा उलगडला जाणार आहे. त्यानंतर करिअर, नेतृत्वविकास, विविध स्पर्धा, गेमिंग आणि आरोग्यविषयक उपक्रमांची रेलचेल असेल. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महोत्सवात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्टार्टअपविषयक कार्यशाळा, उद्योजकांसाठी मार्गदर्शनपर सत्रे, प्रेरणादायी व्याख्याने आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. रविवारी (ता. १) होणाऱ्या ‘स्टार्टअप पिच स्पर्धे’तून नवोदित उद्योजकांना आपल्या कल्पना मांडता येणार आहेत.
आधुनिक आरोग्य तंत्रज्ञानाचा अनुभव
महोत्सवात करिअर झोन, ठाण्याच्या ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडविणारे प्रदर्शन, मानसिक आरोग्य व स्वास्थ्यासाठी ‘फुलपाखरू’ विभाग आणि ‘फ्युचर ऑफ हेल्थ झोन’ उभारण्यात येणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साह्याने त्वचेचे स्कॅनिंग, क्रायोथेरपी, रेड लाइट थेरपी, ईएमएस सूट, लिम्फॅटिक कॉम्प्रेशन, हायड्रोजन इनहेलेशन आणि पायांचे विश्लेषण अशा आधुनिक तंत्रज्ञानाधारित सुविधांची माहिती व अनुभव तरुणांना घेता येणार आहे.
‘हॅलोविन’सह कलाविष्कारांची मेजवानी
शनिवारी संध्याकाळी ‘हॅलोविन’च्या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नामांकित कलाकारांच्या सहभागातून कविता, संगीत, कथाकथन आणि स्टँडअप कॉमेडीचे सादरीकरण होणार आहे. त्यामुळे ज्ञान, करिअर, उद्योजकता आणि मनोरंजन यांचा संगम साधणारा हा युवा महोत्सव ठाण्यातील तरुणाईसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.