उड्डाणपुलासाठी शिवसेना आक्रमक
तुर्भे रेल्वे स्थानकासमोर ठाणे-बेलापूर रोडवर रास्ता रोको
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३० : नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थानकासमोरील ठाणे-बेलापूर रोडवरील रखडलेल्या उड्डाणपुलाचा प्रश्न आता नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असलेल्या या उड्डाणपुलामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत २३ नागरिकांना जीव गमवावा लागला असून, सुमारे ५६ नागरिकांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्याची माहिती आहे, मात्र नवी मुंबई महापालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणा गाढ झोपेत असल्याचा संताप नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे, तर या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाने तुर्भे रेल्वे स्थानकासमोर ठाणे-बेलापूर रोडवर रास्ता रोको आंदोलन केले.
आंदोलकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले; मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाविरोधातील आमचा लढा थांबणार नाही, असा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला. या उड्डाणपुलाच्या कामाचा कार्यादेश २०२२ मध्ये देण्यात आला होता. २०२३ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित असताना आजपर्यंत हे काम पूर्ण झाले नाही. महावीर रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदार कंपनीच्या आर्थिक परिस्थितीबाबत आणि काम पूर्ण करण्याच्या क्षमतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कंत्राटदार काम पूर्ण करू शकत नसेल, तर त्याला पाठीशी घालण्याचे कारण काय? नागरिकांचे जीव गेल्यानंतरही प्रशासनाला जाग येणार कधी? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी या प्रकरणात नवी मुंबई महापालिका आयुक्तांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या वेळी जिल्हा नेते प्रवीण म्हात्रे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला की, कंत्राटदार बदलून उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण केले नाही आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, जिल्हा संघटक रंजनाताई शिंत्रे, अतुल कुलकर्णी, महेश कोटिवाले, संतोष घोसाळकर, संदीप पाटील, समीर बागवान, सिद्धाराम शीलवंत, रोहिणीताई भोईर, वैशाली घोरपडे, प्रवीण पाटील, कार्तिक पिल्ले, राहुल वाघमारे, सचिन चिलमे, अजित गुप्ता, प्रमोद बंडेकर यांच्यासह नवी मुंबईतील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.