दिवाळीत पाणीटंचाईतून दिलासा!
ठाणे, मिरा-भाईंदर, भिवंडीत नियोजित पाणीकपात रद्द
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यामुळे ठाणे, मिरा-भाईंदर आणि भिवंडी शहरांसह ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रातही पाणीपुरवठ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, दिवाळीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी २ आणि ९ नोव्हेंबरला नियोजित पाणी बंद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे राज्य सरकारने १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यानुसार स्टेम प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून होणाऱ्या पुरवठ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आठवड्यातून २४ ते ३६ तास पाणीपुरवठा बंद राहत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक गृहसंकुलांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सुरुवातीला दर बुधवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते; मात्र त्यानंतर वेळापत्रकात बदल करून दर सोमवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २ आणि ९ नोव्हेंबरलाही पाणीपुरवठा बंद राहणार होता. दिवाळीच्या काळात या कपातीमुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता असल्याने नियोजित पाणी बंद रद्द करण्याची मागणी होत होती. अखेर स्टेम प्राधिकरणाने दोन्ही दिवसांचे पाणी बंद रद्द केले. ठाणे महापालिकेनेही स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील नियोजित कपात रद्द केल्याची माहिती प्रशासनाने दिली.
.....
१६ नोव्हेंबरपासून पुन्हा पाणीकपात
ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेत दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी पहाटे ३ वाजेपर्यंत १८ तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन होते; मात्र २८ ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत वेळापत्रकात बदल करून दर सोमवारी सकाळी ९ ते मंगळवारी पहाटे ३ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर २ आणि ९ नोव्हेंबरचे पाणी बंद रद्द करण्यात आले आहेत. मात्र १६, २३ आणि ३० नोव्हेंबरला नियोजित पाणीकपात पुन्हा लागू होणार आहे. डिसेंबरमध्येही ठरलेल्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दिवाळीत नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी पुढील काळात पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.