सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : दिवाळी साजरी करताना ध्वनी आणि वायुप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ठाणे महापालिका प्रशासन कारवाई करणार आहे. शहरातील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत असल्याने फटाक्यांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. केवळ हरित फटाक्यांच्या विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच रस्ते, पदपथ, गल्ल्या आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर विविध कायद्यांनुसार कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दिवाळीच्या काळात वाढणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने २२ सप्टेंबर आणि १५ ऑक्टोबरला दिलेल्या आदेशांनुसार महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार रुग्णालये, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये आणि न्यायालयांच्या १०० मीटर परिसरात तसेच अन्य शांतता क्षेत्रांत फटाके फोडण्यास बंदी असेल. रात्री १० ते सकाळी सहा या वेळेत आवाज करणारे फटाके फोडता येणार नाहीत. खासगी जागेत फटाके फोडतानाही निर्धारित ध्वनिमर्यादांचे पालन करावे लागणार आहे. ध्वनिप्रदूषण नियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम, भारतीय न्याय संहिता आणि स्फोटक पदार्थ अधिनियमानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. नियमभंग आढळल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदत केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
विक्रीसाठीही परवानगी बंधनकारक
फटाक्यांच्या विक्रीवरही महापालिकेने निर्बंध घातले आहेत. प्रतिबंधित फटाक्यांची विक्री करता येणार नाही. अधिकृत फटाके केवळ महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी आणि आवश्यक परवानगी घेऊनच विकता येतील. १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती, विक्री आणि वापर करण्यास मनाई असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
लेझर लाइटचा वापरही टाळावा
दिवाळी उत्सव आणि मिरवणुकांमध्ये लेझर लाइट, उच्च तीव्रतेचे प्रकाशझोत आणि बीम लाइट वापरण्यासही बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रम आणि मिरवणुकांमध्ये ध्वनीची तीव्रता मोजणारी यंत्रे घटनास्थळी किंवा मिरवणुकीसोबत ठेवणे बंधनकारक आहे. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
फटाक्यांच्या धुरातून बाहेर पडणारे सूक्ष्म कण, हानिकारक वायू आणि विषारी धातूंमुळे हवेची गुणवत्ता खालावते. तसेच फटाक्यांच्या मोठ्या आवाजाचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसन व हृदयविकाराच्या रुग्णांना अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी धूर आणि आवाज निर्माण करणारे फटाके टाळून कमी प्रदूषण करणाऱ्या हरित फटाक्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.