बाजारपेठांत वाहतूक बदलाची मागणी
ठाणे शहर, ता. १ (बातमीदार) : दिवाळीच्या खरेदीसाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरासह नौपाडा, राम मारुती रोड, जांभळी नाका आणि स्टेशन रोडवरील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊन व्यापारावर परिणाम होऊ नये, यासाठी व्यापाऱ्यांनी वाहतूक पोलिसांकडे धाव घेतली आहे. सणाच्या काळात बाजारपेठांमधील वाहतुकीत बदल करावा, रस्त्यांवरील पार्किंगवर निर्बंध घालावेत आणि ठाणे महापालिकेच्या स्थानकाकडे जाणाऱ्या बसचा मार्ग वळवावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढणार आहे. त्यातच ग्राहकांची वाहने, नियमित वाहतूक आणि महापालिकेच्या बस यांची वर्दळ सुरू राहिल्यास अरुंद रस्त्यांवर कोंडी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे १२ नोव्हेंबरपर्यंत बाजारपेठांमधील प्रमुख रस्त्यांवर वाहनांना पार्किंग करण्यास मनाई करावी, तसेच पर्यायी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात शुक्रवारी (ता. ३०) व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने ठाणे वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त अंजली भोईर यांची भेट घेतली. बाजारपेठांतील वाहतुकीचे नियोजन करण्याबाबत निवेदन देताना प्रमुख चौकांमध्ये वाहतूक सहाय्यक नेमावेत, कोंडी होणाऱ्या ठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करावेत आणि दिशादर्शक फलक लावावेत, अशा सूचनाही व्यापाऱ्यांनी केल्या.
स्टेशनकडे जाणाऱ्या महापालिकेच्या प्रवासी बसचा मार्ग वळवण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे सणाच्या काळात बाजारपेठांतील वाहतूक सुरळीत राहून ग्राहक आणि व्यापारी दोघांचीही गैरसोय टाळता येईल, असे व्यापारी संघटनेचे मितेश शहा यांनी सांगितले.
दरम्यान, व्यापाऱ्यांनी वाहतुकीच्या नियोजनासाठी निवेदन दिले असून, पार्किंगची सुविधा आणि बसमार्गातील बदलाबाबत परिसराची पाहणी करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी स्पष्ट केले.
टोइंग व्हॅन मुद्द्यावर आरोप
वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून टोइंग व्हॅन पुन्हा सुरू करण्यासाठी नौपाडा व्यापारी संघटनेला पुढे केले जात असल्याचा आरोप समाजसेवक अजय जया यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.