घराजवळच आजारांचे निदान
नऊ महिन्यांत १.८० लाख नागरिकांची तपासणी; पालिकेचा प्रतिबंधात्मक उपाय
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोगासारखे आजार सुरुवातीच्या टप्प्यातच हेरण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा विस्तार केला आहे. महापालिकेच्या विभागीय दवाखाने, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या परिसरातच प्राथमिक तपासणीची सुविधा मिळत आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत एक लाख ८० हजार १०३ नागरिकांची असंसर्गजन्य आजारांसाठी तपासणी करण्यात आली.
या तपासण्यांमुळे आजाराची लक्षणे दिसण्यापूर्वीच संभाव्य रुग्ण शोधण्यास मदत होत आहे. तपासणीत संशयित आढळलेल्या नागरिकांना पुढील निदान आणि उपचारांसाठी संबंधित महापालिका रुग्णालयांकडे पाठविले जाते. त्यामुळे प्राथमिक तपासणीसाठी मोठ्या रुग्णालयात जाण्याची गरज कमी होत असून, उपचाराची साखळी घराजवळून सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आजाराचा धोका लवकर लक्षात आल्यास पुढील तपासणी आणि उपचार वेळेत सुरू करण्याची संधी मिळते, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी दिली.
मधुमेह, रक्तदाबाची प्राथमिक तपासणी
लोकसंख्येवर आधारित सर्वेक्षणातून विशेषतः मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या संभाव्य रुग्णांचा शोध घेतला जात आहे.
मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना जीवनशैलीत बदल करण्यासाठी आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शनही दिले जाते. २०२५ मध्ये ७९ हजार २०, तर जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत ६५ हजार ८५ रुग्णांना आहारविषयक समुपदेशन देण्यात आले.
कर्करोग तपासणीही घराजवळ
महापालिका दवाखाने आणि आपला दवाखान्यांमध्ये कर्करोगाच्या प्राथमिक तपासण्यांवरही भर देण्यात आला आहे. २०२५ मध्ये स्तन, मुख आणि गर्भाशयमुख कर्करोगासाठी मोठ्या प्रमाणावर तपासण्या करण्यात आल्या. संशयित रुग्णांना पुढील निदानासाठी संबंधित रुग्णालयात पाठविण्यात येते.
मानसिक आरोग्याची काळजी
शारीरिक आजारांबरोबरच मानसिक आरोग्याच्या समस्यांकडेही प्राथमिक आरोग्यसेवेचा भाग म्हणून पाहिले जात आहे. ‘मनशक्ती’ कार्यक्रमांतर्गत नागरिकांना समुपदेशन आणि गरजेनुसार पुढील उपचारांसाठी संदर्भसेवा दिली जात आहे. २०२५ मध्ये एक लाख ६८ हजार ६८७ व्यक्तींना, तर जानेवारी ते सप्टेंबर २०२६ मध्ये ७२ हजार १८ व्यक्तींना समुपदेशन देण्यात आले.
तरुणांसाठी ‘हेल्दी कॅम्पस’
असंसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यासाठी तरुणांमध्येही प्रतिबंधात्मक आरोग्याबाबत जागृती करण्याचे नियोजन आहे. ‘हेल्दी कॅम्पस’ उपक्रमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फास्ट फूडचे दुष्परिणाम, सकस आहार तसेच आहारातील मीठ आणि साखरेचे प्रमाण याबाबत माहिती दिली जाणार आहे.
जानेवारी - सप्टेंबर २०२६
सेवा लाभार्थी
असंसर्गजन्य आजारांची तपासणी १,८०,१०३
आहारविषयक समुपदेशन ६५,०८५
मानसिक आरोग्य समुपदेशन ७२,०१८
कर्करोग तपासणी - २०२५
- मुख कर्करोग : २,७२,४२८
- स्तन कर्करोग : २७,७७४
- गर्भाशयमुख कर्करोग : ११,६८९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.