स्मार्ट मीटरचा संभ्रम दूर
मोबाईलवर वीजवापर तपासणे शक्य
ठाणे, ता. २ (बातमीदार) : स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिल येत असल्याच्या तक्रारी आणि ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणने वीजवापराच्या डिजिटल नोंदी तपासण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ‘महावितरण’ ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना मोबाईलवरच दैनंदिन वीजवापराची माहिती पाहता येते. त्यामुळे बिल वाढण्यामागे घरातील विद्युत उपकरणांचा वाढलेला वापर कारणीभूत आहे की मीटरमध्ये तांत्रिक दोष आहे, याची पडताळणी करणे सोपे होणार आहे, मात्र केवळ डिजिटल नोंदींवरून प्रत्येक तांत्रिक दोष शोधता येत नाही, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अभिनय कट्ट्याच्या वतीने नौपाडा येथील अभिनय कट्टा येथे ‘स्मार्ट मीटर : शाप की वरदान?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश मसने आणि सहाय्यक अभियंता किशोर सावरकर यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. स्मार्ट मीटर खासगी कंपनीचे असून, ते वेगाने चालत असल्याने वीजबिल वाढते, हा समज चुकीचा असल्याचे मसने यांनी स्पष्ट केले. हे मीटर महावितरणचे असून, सिम कार्डद्वारे वीजवापराची माहिती थेट कार्यालयात पोहोचते. त्यामुळे प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेण्याची गरज कमी होते. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्याची माहितीही तातडीने मिळण्यास मदत होते.
वीजबिल वाढल्यास बिलाचा कालावधी, वापरलेली युनिट्स आणि मागील महिन्याच्या वापराची तुलना करावी. पंखे, फ्रिज, वातानुकूलन यंत्रणा आणि पाण्याच्या पंपाचा वापर वाढला आहे का, हेही तपासावे. कारण स्पष्ट न झाल्यास मीटर किंवा उपकरणांची तपासणी करण्यासाठी महावितरणकडे तक्रार करता येते.
दरम्यान, घरगुती स्मार्ट मीटरधारकांना १ एप्रिल २०२६ पासून सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेवर प्रतियुनिट ८५ पैशांची सवलत लागू आहे. मोबाईलवर वीजवापर तपासण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आयोजित करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. पुढील बैठकीत याबाबत प्रात्यक्षिक घेण्यावर चर्चा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.