चार दिवसांच्या लढ्याला चर्चेचे फलित
प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन
कासा, ता. २ (बातमीदार) : तलासरी तालुक्यातील उधवा ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी ग्रामस्थांनी सलग चार दिवस केलेले धरणे आंदोलन ३१ ऑक्टोबर रोजी चर्चेनंतर स्थगित केले. ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविस्तार अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध मागण्यांवर कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
बैठकीत उधवा बस स्थानकावरील अतिक्रमण हटवून शेड उभारणे, मातीभराव करणे आणि मच्छी विक्रेत्यांसाठी १५ डिसेंबरपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याचे ठरले. आदिवासी भवन व ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणारा रस्ता मोकळा करण्यासाठी सुरेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या प्रतिनिधींना ४ नोव्हेंबरला बैठकीस उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. कार्यवाही न झाल्यास कंपनीच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्याचा इशाराही देण्यात आला.
गावात पुढील चार दिवसांत घंटागाडी सुरू करून ओला कचरा संकलित करण्याचे ठरले. प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई, अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणि बाजारपेठेतील अनियमिततेची तपासणी करण्याच्या मागण्यांवरही चर्चा झाली. हॉटेल, किराणा दुकाने, मेडिकल स्टोअर्स आणि चायनीज सेंटरच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. वैद्यकीय सुविधांबाबत १८ नोव्हेंबरला विशेष सभा होणार आहे. पंधरावा वित्त आयोग आणि स्वच्छ भारत अभियानासह विविध विकासकामांच्या खर्चाचा हिशेब ग्रामस्थांनी मागितला आहे. मागण्यांवर मुदतीत कार्यवाही न झाल्यास सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. चार दिवसांच्या आंदोलनानंतर मिळालेल्या आश्वासनांची अंमलबजावणी कधी होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.