चेंबूरमध्ये धोकादायक इमारतीत नर्सरी सुरू
५० ते ६० चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुबई, ता. २ : चेंंबूरमध्ये सिंधी सोसायटी परिसरातील जीर्ण व धोकादायक घोषित केलेल्या इमारतीत नर्सरी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या नर्सरीमध्ये दररोज सुमारे ५० ते ६० चिमुकले शिक्षण्यासाठी येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या सिंधी समुदायाने चेंबूरमध्ये ज्या परिसरात घरे, बंगले उभारले त्याला सिंधी सोसायटी म्हणतात. काळाच्या ओघात या परिसरातील अनेक इमारती जीर्ण झाल्या असून, काही इमारतींचा खासगी विकसकांमार्फत पुनर्विकास सुरू आहे.
याच परिसरातील प्लॉट क्रमांक ३९ अ, ब वरील इमारतीत तळमजला आणि दोन मजले आहेत. या इमारतीत सुमारे एकूण नऊ रहिवासी राहत असल्याची माहिती आहे. इमारत जीर्ण व धोकादायक असल्याने ती रिकामी करण्याची सूचना पालिकेकडून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे; तरीही ही इमारत अद्याप रिकामी करण्यात आलेली नाही. त्यातच या इमारतीतील भाड्याच्या जागेत एका व्यक्तीने नर्सरी सुरू केली असून, येथे ५० ते ६० लहान मुले शिक्षण घेत आहेत.
इमारत धोकादायक असल्याची नोटीस मुंबई महापालिकेच्या एम-पश्चिम विभागाने तेथे लावली असतानाही नर्सरी सुरू असल्याने पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. धोकादायक इमारतीत लहान मुलांचा नियमित वावर असून हे चिंताजनक आहे. इमारतीची सद्य:स्थिती लक्षात घेता एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
पालिकेने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करावी. तसेच नर्सरीच्या जागेची सुरक्षितता, आवश्यक परवानग्या आणि मुलांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची तपासणी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. ५० ते ६० चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना पालिका प्रशासन या प्रकरणात कोणती ठोस कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत पुन्हा माहिती घेण्यात येईल. तसेच संबंधित इमारतीची पाहणी करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना पाठविण्यात येईल. पाहणीनंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- शंकर भोसले, सहाय्यक आयुक्त, पालिका एम-पश्चिम विभाग
याप्रकरणी तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारत तत्काळ रिकामी करणे गरजेचे आहे.
- आशा मराठे, नगरसेविका, भाजप
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.