दुर्मिळ पुस्तकांतून ज्ञानाचा खजिना
वसईत १८९० ते २००० या काळातील पुस्तकांचे प्रदर्शन
वसई, ता. २ (बातमीदार) : एखादे पुस्तक माणसाच्या विचारांना नवी दिशा देऊन त्याच्या आयुष्यात क्रांतिकारी परिवर्तन घडवू शकते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील गौतम बुद्धांच्या चरित्रग्रंथाचा संदर्भ देत प्रा. मिलिंद मराठे यांनी पुस्तकांच्या परिवर्तनकारी शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय आणि संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘मुंबई पुस्तक महोत्सव २०२६’ अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. गोविंद वढवेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला भेट मिळालेल्या १८९० ते २००० या कालखंडातील दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले.
या वेळी बोलताना प्रा. मराठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालेय जीवनातील प्रसंग सांगितला. नववीत शिकत असताना शिक्षक दादा केळुसकर यांनी त्यांना गौतम बुद्धांच्या चरित्राचे पुस्तक भेट दिले होते. हे पुस्तक वाचल्यानंतर समतेची खरी स्थापना गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानातूनच होऊ शकते, असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला. या उदाहरणातून पुस्तकांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यातील आणि समाजपरिवर्तनातील महत्त्व स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रशासक फादर डॉ. अनिल परेरा, साहित्यिक वीणा गवाणकर, प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते, उपप्राचार्य सरिथा कुरियन, ग्रंथपाल डॉ. चैतन्य वीर, ॲड. गुरुनाथ शेट्ये, सुधीर गायकवाड, डॉ. श्रीराम पाटील, प्रा. मंदार भानुसे, चिन्मय गवाणकर यांच्यासह शिक्षण व साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य शोभना वाझ, उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोझा आणि माजी माहिती शास्त्रज्ञ इंद्रजीत धर्मापुरीकर यांचीही विशेष उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. विभुते यांनी प्रास्ताविक केले. हिंदी विभागप्रमुख डॉ. रामदास तोंडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अनिल सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रंथपाल डॉ. चैतन्य वीर यांनी आभार मानले.
--------
वसई : गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात भरवलेले पुस्तक प्रदर्शन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.