दिवाळी बाजारात चोरांची धूम
कल्याण, ता. २ (बातमीदार) : दिवाळीच्या खरेदीसाठी डोंबिवली पूर्वेतील बाजारपेठेत झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन चिमुरड्या मुलींच्या गळ्यातील सोन्याचे पेंडंट लंपास केले. एकाच फटाक्याच्या स्टॉलवर खरेदी सुरू असताना घडलेल्या या प्रकारामुळे बाजारात एकच खळबळ उडाली. मात्र एका मुलीच्या आजीने प्रसंगावधान राखत चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडले. नागरिकांच्या मदतीने आणखी एका साथीदारालाही पकडण्यात आले; तर तिसरा आरोपी पसार झाला. डोंबिवली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, योगिता पवार (वय ४४) या रविवारी (ता. १) रात्री सून आणि नातीसह डोंबिवली पूर्वेकडील नाका क्रमांक एकसमोरील बाजारात फटाके खरेदीसाठी गेल्या होत्या. एका स्टॉलवर खरेदी सुरू असताना त्यांची नात श्रेया अचानक ओरडली. गळ्यातील धाग्याला असलेले सोन्याचे पेंडंट गायब झाल्याचे तिच्या लक्षात आले. अज्ञात व्यक्तीने पेंडंट ओढून नेल्याचे समजताच योगिता पवार यांनी प्रसंगावधान राखत संबंधित चोरट्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेत त्याच्या साथीदाराला पकडले. मात्र, तिसऱ्या आरोपीने गर्दीचा फायदा घेत पळ काढला.
या गोंधळादरम्यान याच बाजारात खरेदीसाठी आलेल्या किरण पाटील (वय ३६) यांच्या मुलीच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडंटही चोरीला गेल्याचे उघड झाले. दोन्ही घटनांमध्ये सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेची माहिती मिळताच डोंबिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. सोन्या हिरामण सुरवळे (वय २०) आणि भीमराव शामराव जाधव (वय २५) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यासह पसार झालेल्या तिसऱ्या आरोपीविरुद्धही कायदेशीर कारवाई सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.