बाजारपेठांत प्लॅस्टिकचा कहर
नाले तुंबण्यासह जनावरांच्या आरोग्यालाही धोका
वसई, ता. २ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका क्षेत्रात प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर पुन्हा वाढू लागला आहे. भाजी मंडयांसह सार्वजनिक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याने शहरात प्लॅस्टिक कचऱ्याचा पसारा वाढत आहे. प्लॅस्टिकमुक्त शहराचा संकल्प कागदावरच राहिल्याचे चित्र वसई-विरारमध्ये दिसत आहे. प्रतिबंधित प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर पुन्हा वाढला असून, रस्त्यांच्या कडेला प्लॅस्टिक कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. प्लॅस्टिकच्या या वाढत्या वापरामुळे नाले तुंबणे, अस्वच्छता आणि मोकाट जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे महापालिकेने प्लॅस्टिकविरोधी कारवाई अधिक कठोर आणि नियमित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
काही वर्षांपूर्वी शासनाने एकल वापराच्या प्लॅस्टिकवर बंदी घातल्यानंतर महापालिकेने दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली होती. सुरुवातीला या कारवाईचा परिणाम दिसून आला आणि प्लॅस्टिकच्या वापरावर काही प्रमाणात नियंत्रण आले होते. मात्र, कालांतराने कारवाईचा जोर कमी झाल्याने बाजारपेठांमध्ये पुन्हा प्लॅस्टिक पिशव्या, कंटेनर आणि वेष्टनांचा वापर वाढल्याचे चित्र आहे. विशेषतः भाजीविक्रेते आणि ग्राहकांकडून सोयीसाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे.
प्लॅस्टिक पिशव्या नाल्यांमध्ये अडकून सांडपाण्याचा प्रवाह रोखतात. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. रस्त्यावर फेकलेल्या प्लॅस्टिक पिशव्या खाल्ल्याने मोकाट जनावरांच्या आरोग्यालाही गंभीर धोका पोहोचू शकतो. प्लॅस्टिक कचऱ्यामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्लॅस्टिक विक्रेते आणि वापरकर्त्यांवर नियमित कारवाई करण्याबरोबरच जनजागृती मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे.
दिवाळीच्या गर्दीत विशेष लक्ष
दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होणार आहे. या काळात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर आणि कचऱ्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या पथकांचे बाजारपेठांवर विशेष लक्ष राहणार आहे. प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून प्लॅस्टिक जप्त केले जात असल्याचे महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र नाईक सांगितले.
फोटो कॅप्शन : वसईतील मुख्य रहदारी मार्गालगत साचलेला प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.