उघड्या मॅनहोलचा धोका
अपघात टाळण्यासाठी अंकित नाईक यांची अनोखी कृती; व्हिडिओ व्हायरल
उलवे, ता. २ (बातमीदार) : उलवे सेक्टर १९ बी परिसरात रस्त्यालगत असलेल्या उघड्या मॅनहोलमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मॅनहोलचे झाकण तुटल्याने किंवा गायब झाल्याने येथे मोठे भगदाड पडले आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्पमित्र अंकित नाईक यांनी या खड्ड्यात स्वतः झाड आणून लावले. त्यांच्या या अनोख्या कृतीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
रात्रीच्या वेळी अंधारात हे भगदाड सहज दिसत नसल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना अपघाताचा धोका आहे. मॅनहोलमध्ये नागरिक किंवा वाहन पडल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते. परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि उघड्या मॅनहोलमुळे नागरिकांना ये-जा करताना काळजी घ्यावी लागत आहे.
खड्ड्यात झाड लावल्याने तरी येथून जाणाऱ्या नागरिकांना धोक्याची जाणीव होईल आणि संभाव्य अपघात टाळता येतील, हा नाईक यांचा उद्देश आहे.
प्रशासनाने करावयाचे काम एका जागरूक नागरिकाने पुढाकार घेऊन केले आहे. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. ही समस्या केवळ एका ठिकाणापुरती मर्यादित नसून, उलवेतील अनेक रस्त्यांवर अशाच प्रकारचे धोकादायक मॅनहोल आहेत, असे अंकित नाईक यांनी सांगितले.
अपघाताची प्रतीक्षा कशासाठी?
अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. सिडको प्रशासनाने तातडीने मॅनहोलची झाकणे बसवावीत, रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.