निकृष्ट रस्ता करणारा कंत्राटदार कायमचा ‘ब्लॅकलिस्ट’
अधिकाऱ्यावरही कारवाई होणार; सभागृहात ठराव एकमताने मंजूर
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ ः पालिका क्षेत्रात उत्कृष्ट दर्जाच्या रस्त्यांची निर्मिती व्हावी यासाठी सभागृहात एक महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. नव्या धोरणानुसार निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकले जाईल, तसेच निष्काळजी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावरही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सभागृहात दिला आहे.
सभागृह नेते सागर नाईक यांनी यासंदर्भातील धोरणाचा प्रस्ताव मांडताना शहरातील रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत कठोर भूमिका स्पष्ट केली. सामाजिक माध्यमांवर नागरिक वर्षभरातच रस्त्यांची चाळण झाल्याच्या तक्रारी करतात, असे चित्र नवी मुंबईत दिसता कामा नये, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, बाहेरच्या शहरांमध्ये आणि परदेशात रस्ते चांगले बनू शकतात, तर नवी मुंबईत का नाही, असा प्रश्न उपस्थित करत रस्ते उत्तम दर्जाचे बनवण्यासाठी नियत आणि सकारात्मक मानसिकतेची गरज असल्याचे सभागृह नेत्यांनी अधोरेखित केले. या धोरणामुळे नवी मुंबईकरांना दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांची हमी मिळणार असून, संपूर्ण सभागृहाने या ठरावाला एकमुखाने मंजुरी दिली आहे.
रस्त्यांच्या कामासाठी गॅरंटीचा कालावधी निश्चित
नव्या धोरणानुसार, कंत्राटदारांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्चित केली आहे. यानुसार रस्त्यांच्या कामाची ‘डिफेक्ट लायबिलिटी’ (गॅरंटी) निश्चित केली आहे. या निर्धारित कालावधीत रस्ता खराब झाला, तर संबंधित कंत्राटदाराला कायमचे ब्लॅकलिस्ट केले जाईल आणि निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यावरही कडक कारवाई करण्याची तरतूद या धोरणात करण्यात आली आहे.
री-सरफेसिंग केलेले रस्ते : ५ वर्षे
टी.डब्ल्यू.डी. रस्ते : ७.५ वर्षे
सब-बेसपासून नव्याने बनवलेले रस्ते : १० वर्षे
काँक्रीटचे रस्ते : १५ वर्षे
खोदाई करणाऱ्यांकडून खर्च वसूल करणार
रस्त्यांच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरणारे मुख्य कारण म्हणजे युटिलिटी सर्व्हिसेससाठी पालिकेकडून घेतली जाणारी खोदाई होय. रस्त्यावर नागमोडी स्वरूपात होणाऱ्या या खोदाईमुळे आणि त्यानंतर होणाऱ्या निकृष्ट डागडुजीमुळे संपूर्ण रस्ता पुन्हा नव्याने बनवावा लागतो. यावर उपाय म्हणून, आरओडब्ल्यू परवानगी देताना खोदाई करणाऱ्या घटकाकडून संपूर्ण रस्त्याचा दुरुस्ती खर्च वसूल केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.