मुंबई, ता. ३ : केवळ सहा किलो वजनाच्या आणि जनुकीय आजारामुळे यकृत निकामी होण्याच्या स्थितीत असलेल्या एक वर्षाच्या बाळावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स रुग्णालयात झालेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत बाळाच्या आईने यकृताचा एक भाग दान करून मुलाला जीवनदान दिले. डॉ. आदित्य कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांतील तज्ज्ञांनी शस्त्रक्रिया केली.
‘शिव’ (नाव बदलले आहे.) या बाळाला जन्मापासून त्वचेला खाज आणि गडद रंगाची लघवी होत होती. आठव्या महिन्यापर्यंत खाज वाढली, वजन वाढत नव्हते आणि पोट फुगत होते. तपासणीत बिलीरुबिनचे प्रमाण वाढलेले, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत गंभीर बिघाड तसेच यकृतावर व्रण आढळले. सहाव्या महिन्यातील यकृताची ऊतक तपासणी आणि जनुकीय चाचण्यांमधून अलागिल सिंड्रोम असल्याचे स्पष्ट झाले. या आजारामुळे यकृतासह इतर अवयवांवरही परिणाम होऊ शकतो.
नियमित देखरेख आवश्यक
सुमारे १० तास चाललेल्या शस्त्रक्रियेत बाळाचे खराब झालेले यकृत काढून आईने दान केलेला यकृताचा भाग बसविण्यात आला. त्यानंतर रक्तवाहिन्या आणि पित्तनलिका जोडण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर बाळाला सात दिवस प्रत्यारोपण अतिदक्षता विभागात आणि त्यानंतर आठ दिवस विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले. आईला पाच दिवसांनी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पंधरा दिवसांच्या उपचारानंतर बाळाची प्रकृती सुधारली असून, पुढील काळात यकृत, हृदय आणि मूत्रपिंडाच्या स्थितीवर नियमित देखरेख आवश्यक राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.