सुकसाळेमध्ये लोकवर्गणीतून साकारतेय तारांगण
ग्रामीण विद्यार्थ्यांना अवकाशविश्वाची सफर
कासा, ता. ३ (बातमीदार) : ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञानाची गोडी लागावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि अवकाशविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, या उद्देशाने विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे (पाटीलपाडा) येथे ६० आसनी भव्य तारांगण उभारण्यात येत आहे. लोकवर्गणीतून साकारत असलेल्या या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शिक्षणाचे नवे दालन खुले होणार आहे. अवकाश निरीक्षणाची चळवळ जिल्ह्यात रुजविणारे चंद्रकांत घाटाळ यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
आदिवासी समाजातील व्यक्तीने भारतातील पहिले अवकाश निरीक्षण केंद्र स्थापन केल्याची ओळख असलेल्या घाटाळ यांनी २०१५मध्ये कासा येथे पालघर जिल्ह्यातील पहिले अवकाश निरीक्षण केंद्र सुरू केले. या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या दुर्बिणींद्वारे ग्रह, तारे, चंद्र आणि इतर खगोलीय घडामोडींचे निरीक्षण करण्याची संधी दिली जाते. विविध खगोलीय उपकरणांच्या सहाय्याने अवकाश विज्ञानाची माहिती विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आजवर २५ हून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
या उपक्रमाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने आता सुकसाळे येथे तारांगण उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी सामाजिक कार्यकर्ते दिनेश तारवी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जमीन दान स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. लोकसहभागातून उभ्या राहणाऱ्या या तारांगणात एकावेळी ६० विद्यार्थी अवकाशविश्वाची माहिती घेऊ शकणार आहेत. त्यामुळे दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे नवे व्यासपीठ मिळणार आहे.
या प्रकल्पासाठी अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र, कासा, सामाजिक कार्यकर्ते दिनेश तारवी, प्रकाश भोईर, डॉ. यशवंत गभाले (सायन रुग्णालय), धर्मा पाटील, प्रा. सुधीर भोईर, अभियंता जीत दुमाडा, प्रा. प्रद्युम्न पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रमोद पाटील, SPAKT शैक्षणिक संस्थेचे सुकलाल पाटील, सबको शिक्षा फाउंडेशन, सुकसाळे ग्रामस्थ आणि विज्ञानप्रेमी यांनी योगदान दिले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र उभे राहत असल्याने या प्रकल्पाला अधिकाधिक लोकसहभागाची गरज आहे. लोकप्रतिनिधी, कंत्राटदार, व्यापारी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि दानशूर नागरिकांनी आर्थिक तसेच वस्तुरूप मदत करावी, असे आवाहन चंद्रकांत घाटाळ यांनी केले आहे.
Ai निर्मित चित्र तारांगण..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.