उल्हासनगर, ता. ३ (बातमीदार) : शहरातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, आता नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध फुटू लागला आहे. घराघरात नियमित पाणी मिळत नसल्याने नागरिक रस्त्यावर संताप व्यक्त करू लागले आहेत. एका आठवड्यात महिलांवर रास्ता रोको आंदोलन करण्याची तिसऱ्यांदा वेळ आली आहे.
उल्हासनगर शहरात पाणीपुरवठ्याची समस्या वारंवार डोके वर काढत असून, एका भागातील आंदोलन शांत होत नाही तोच दुसऱ्या भागातून पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र दिसत आहे. आता उल्हासनगर कॅम्प-५ मधील पॅनेल क्रमांक १९ अंतर्गत येणाऱ्या वीर तानाजी नगर परिसरातही पाणीटंचाईविरोधात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. वीर तानाजी नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची नियमित आणि पुरेशी उपलब्धता होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, दैनंदिन घरगुती कामांसाठीही पाणी मिळवताना नागरिकांची मोठी दमछाक होते. या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, या मागणीसाठी संतप्त महिला आणि स्थानिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला.
चालकांची महिलांशी बाचाबाची
आंदोलन सुरू असताना तेथून जाणाऱ्या काही वाहनचालकांची आंदोलनकर्त्या महिलांशी बाचाबाचीही झाली. अचानक रस्ता अडवण्यात आल्याने काही वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मात्र, नागरिकांचा मुख्य रोष हा पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेविरोधात असल्याचे आंदोलनातून स्पष्ट झाले.
पोलिसांची धाव
आंदोलनाची माहिती मिळताच हिललाइन पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांशी संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा तसेच वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रश्न केवळ समजूत काढून सुटणारा नसल्याने पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी करीत उल्हासनगर पालिकेच्या जलपुरवठा विभागाचे अधिकारी अश्विनी राठोड यांनाही घटनास्थळी बोलावून घेतले.
आश्वासनानंतर आंदोलन मागे
पोलिसांच्या मध्यस्थीने स्थानिक नागरिक आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याची समस्या लवकरात लवकर दूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्या महिलांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे काही काळ विस्कळित झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.