उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मिशन सुधार मोहिमेअंतर्गत धान्यपुरवठा बंद करण्यात येत आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्या शहरातील शिधापत्रिकाधारकांना नियमांचा मोठा फटका बसला आहे. कुटुंबातील एकाच सदस्याने प्राप्तिकर विवरणपत्र भरले आणि ते अगदी झीरो रिटर्न असले तरी संपूर्ण कुटुंबाचा स्वस्त धान्याचा लाभ धोक्यात येतो. उल्हासनगरमध्ये अशा तब्बल सात हजार शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या असून, आणखी साडेचार हजार शिधापत्रिकांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
राज्य सरकारच्या निकषांनुसार, वार्षिक ५९ हजारांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाच सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ दिला जातो. मात्र, कुटुंबातील एकाही सदस्याने प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केले असल्यास आणि जरी ते शून्य उत्पन्नाचे असले तरी संपूर्ण कुटुंबाची शिधापत्रिका पांढऱ्या श्रेणीत वर्ग करण्यात येत असल्याची माहिती शिधावाटप अधिकारी ज्योती कैलास भोर यांनी दिली. या निकषांनुसार उल्हासनगर एक, दोन आणि तीन परिसरातील सात हजार शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या असून, आणखी चार हजार ५०० शिधापत्रिका बंद करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. संबंधित शिधापत्रिकांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.
२५ दुकानांचे परवाने रद्द
उल्हासनगर परिसरात एकूण १०९ स्वस्त धान्य दुकाने असून, त्यापैकी २५ दुकानांचे परवाने रद्द करून त्यांना अन्य कार्यरत दुकानांशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या ८४ दुकाने कार्यरत आहेत. अंत्योदय योजनेतील ५०० शिधापत्रिकाधारकांना प्रतिकार्ड ३५ किलो मोफत धान्य मिळते. तर प्राधान्य कुटुंब आणि अन्य पात्र श्रेणीतील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य दिले जाते. दरम्यान, आयकर विवरणपत्राच्या निकषांमुळे आणखी हजारो कुटुंबांचा स्वस्त धान्याचा लाभ बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मोहिमेची कार्यपद्धती
मिशन सुधारअंतर्गत आयकर विभाग आणि आरसीएमएस प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थ्यांची माहिती संकलित केली जाते. उत्पन्नाची पडताळणी करून राज्य सरकारकडून जिल्ह्याला संबंधित लाभार्थ्यांची यादी पाठविली जाते. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी तालुका स्तरावर तपासणीचे निर्देश देतात. अपात्रता सिद्ध झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा बंद केला जातो.
नोंदणीकृत शिधापत्रिका ५६,०००
शिधापत्रिका सक्रिय ४९,२६२
लाभार्थ्यांना धान्यवाटप १,७४,८४५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.