विकासकामे ठप्प करून केवळ निलंबनाचेच खेळ?
नवी मुंबई पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हाय व्होल्टेज ड्रामा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ ः पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगररचना सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण आणि विधी अधिकारी अभय जाधव यांच्या निलंबनाच्या ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. विकासकामांचे मुद्दे बाजूला ठेवून वारंवार अधिकाऱ्यांच्या निलंबनाचेच ठराव सभागृहात आणले जात असल्याचा आरोप करीत विरोधी सदस्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. दुसरीकडे नगररचना विभागातील कथित अनियमितता, भूखंडांचे वापर बदल आणि कर्तव्यातील कसूर या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत निलंबनाची कारवाई समर्थनीय असल्याचे ठासून सांगितले.
सभागृहाच्या कामकाजादरम्यान सत्ताधाऱ्यांनी सोमनाथ केकाण यांच्या महापालिकेतील प्रतिनियुक्तीवरील सेवा तत्काळ संपुष्टात आणून त्यांना मूळ विभागाकडे परत पाठवण्याचा आणि कार्यमुक्त होईपर्यंत त्यांना तत्काळ निलंबित करण्याचा ठराव मांडला. याआधीही सत्ताधाऱ्यांनी केकाण यांच्या निलंबनाचा ठराव संमत केला होता, परंतु राज्य सरकारने तो नामंजूर केला होता. पुन्हा दुसऱ्यांदा तोच ठराव सभागृहात आणल्याने विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला. याचप्रमाणे विधी अधिकारी अभय जाधव यांना चौकशी अधिकाऱ्याने निर्दोष मुक्त केलेले असतानाही सत्ताधाऱ्यांनी पुन्हा त्यांच्या निलंबनाचा ठराव बहुमताने मंजूर करून घेतल्याने सभागृहात गदारोळ माजला. चर्चेदरम्यान विरोधी नगरसेवकांनी प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रियांचा दाखला देत नियमांवर बोट ठेवले. प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांना वेठीस धरून निलंबित करायचे ही कसली पद्धत? कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता, कारण दाखवा नोटीस न देता परस्पर कारवाई करणे चुकीचे आहे, असे नगरसेवक द्वारकानाथ भोईर आणि नगरसेवक शिवराम पाटील यांनी सांगितले. अवनी व नैवेद्य प्रकरणासह शहराचे इतर प्रश्न सोडवण्याऐवजी दर महिन्याला अधिकारी निलंबित करून विकासकामे ठप्प केली जात आहेत, असा आरोप गटनेते मनोज हळदणकर यांनी केला. या आरोपांना प्रत्युत्तर देताना सत्ताधारी सदस्यांनी नगररचना विभागातील कथित गैरप्रकार आणि विकास आराखड्यातील अनियमिततांवर सभागृह नेते सागर नाईक आणि नगरसेवक सूरज पाटील यांनी बोट ठेवले. संबंधित अधिकाऱ्याने महापालिका आणि शहराचे अपरिमित नुकसान केले आहे. राखीव भूखंड, रस्ते आणि डीपीमधील तरतुदी डावलून बेकायदा पद्धतीने बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे शहराच्या हिताचे नाही, असा युक्तिवाद उपमहापौर दशरथ भगत यांनी केला.
सोमनाथ केकाण यांच्यावर दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई
तासाभराच्या वादळी चर्चेनंतर महापौर सुजाता पाटील यांनी केकाण यांच्या निलंबनाचा व सेवा मूळ विभागाकडे परत पाठवण्याचा ठराव मतदानाला टाकला. सभागृहात पार पडलेल्या मतदानात ठरावाच्या बाजूने ३१, विरोधात २० आणि २ सदस्य तटस्थ राहिले. परिणामी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील ५३ (१), ५६ (४) व इतर लागू शासन निर्णयातील तरतुदींनुसार सोमनाथ केकाण यांच्या निलंबनाचा आणि मूळ विभागात परत पाठवण्याचा प्रस्ताव बहुमताने संमत झाल्याचे महापौरांनी जाहीर केले.
महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. त्या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेण्यास भाजप सत्ताधारी मंजुरी देत आहेत; पण ज्या अधिकाऱ्याने चुकीचे काम केलेले नाही, अशा अधिकाऱ्याने फक्त त्यांचे ऐकले नाही म्हणून निलंबनाची अन्यायकारक कारवाई केली जात आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेला हा निलंबनाचा ठराव पुन्हा नगरविकास विभागाकडून विखंडित करून आणू.
- किशोर पाटकर, नगरसेवक, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.