सायकल ट्रॅकवर अवजड वाहनांचे पार्किंग
नेरूळमध्ये वाहतुकीला अडथळे; अपघातांची भीती
जुईनगर, ता. ३ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर ६, १४, १६ आणि १८ परिसराला लागून असलेल्या पाम बीच मार्गालगतच्या उपमार्गावर अवजड वाहनांचे बेकायदा पार्किंग वाढले आहे. वझिरानी सिग्नल ते प्रशांत कॉर्नर सिग्नलदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. विशेषतः सायकल ट्रॅकवरही अवजड वाहने उभी राहत असल्याने सायकलस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
नेरूळमधील हा महत्त्वाचा निवासी परिसर असून, येथे नागरिकांसाठी स्वतंत्र पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक आणि सुसज्ज रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे, मात्र अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे या सुविधांचा वापर करणे कठीण झाले आहे. विशेषतः रात्री आणि पहाटे मोठ्या संख्येने वाहने उभी असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्किंग केल्याने मार्ग अरुंद होतो. तसेच चार रस्ते जोडणाऱ्या ठिकाणी वळणावर वाहने उभी असल्याने दोन्ही बाजूंनी येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
सायकलस्वारांची सुरक्षितता धोक्यात
सायकल ट्रॅकवर वाहने उभी राहत असल्याने सायकलस्वारांना मुख्य रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. भरधाव वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढताना त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे. यामुळे स्वतंत्र ट्रॅक उभारण्याचा उद्देशच निष्फळ ठरत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या मार्गावरील अवजड वाहने हटवून पार्किंगला निर्बंध घालावेत, अशी मागणी होत आहे. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच नियमित गस्त, मनाई फलक आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.