ठाणे शहर, ता. ३ (बातमीदार) : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये उसळलेली गर्दी, रस्त्यांवरील तात्पुरत्या जाहिरात कमानी, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, रस्त्यांची दुरवस्था आणि विविध मागण्यांसाठी निघणारे मोर्चे यामुळे ठाणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसर, नौपाडा, जांभळी नाका, राम मारुती रोड, कोपरी आणि इंदिरानगर परिसरात सायंकाळच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे काही मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना तासभर वेळ खर्च करावा लागत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. अरुंद रस्ते, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि रस्त्यांच्या कडेला उभी केली जाणारी वाहने यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. गल्लीबोळांमध्ये तसेच पदपथांवर फेरीवाल्यांनी स्टॉल उभारल्याने पादचाऱ्यांसह वाहनचालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकमान्य नगर नाका यासारख्या भागातून ठाणे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण २० मिनिटे लागत असताना आता त्यासाठी तासभर वेळ लागत आहे.
मेट्रोची सुरू असलेली कामे, रस्त्यांवरील खड्डे आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे आधीच वाहतुकीवर ताण आहे. त्यातच जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोर्ट नाका परिसरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व संघटनांकडून मोर्चे आणि आंदोलने केली जात असल्याने वाहतूक वळवावी लागत आहे. परिणामी मुख्य रस्त्यांवरील वाहनांचा भार अंतर्गत रस्त्यांवर पडत आहे. घोडबंदर मार्गावर मॉल आणि व्यावसायिक केंद्रांकडे जाणाऱ्या वाहनांमुळे कासारवडवलीपर्यंत वाहतुकीचा ताण जाणवत आहे.
या ठिकाणी हाल
नौपाडा, जांभळी नाका, रेल्वे स्थानक परिसर, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, कळवा आणि मुंब्रा रोड ही ठिकाणे सायंकाळी वाहतूक कोंडीची प्रमुख केंद्रे बनली आहेत. या कोंडीचा फटका नोकरदार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना बसत आहे. वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत आहे.
वाहतूक पोलिस सज्ज
वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विविध ठिकाणी अधिकारी, कर्मचारी आणि वॉर्डन तैनात केले आहेत. कोपरी, ठाणे नगर, नौपाडा आणि राबोडी या चार युनिटमध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये ७० कर्मचारी आणि ३० वॉर्डन कार्यरत आहेत.
ठाणे शहर वाहतूक शाखेतील सर्व वाहतूक उप विभागांमध्ये पुरेसा बंदोबस्त तैनात केला असून, त्यांच्यामार्फत दिवस-रात्र वाहतुकीचे नियमन केले जात आहे.
- पंकज शिरसाट, पोलिस उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.