अलिबाग आगारात बससेवा विस्कळित
बिघाडामुळे प्रवाशांची गैरसोय; नव्या बसची मागणी
अलिबाग, ता. ३ (वार्ताहर) : अलिबाग एसटी आगारातील बस वारंवार रस्त्यातच बंद पडत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यातच ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे सुरू असल्याने अनेक बसफेऱ्या गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे आगाराला नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये दररोज पेण, पनवेल, मुंबई, पुण्यासह जिल्ह्यातील विविध भागांतून हजारो प्रवासी एसटीने ये-जा करतात, मात्र आगारातून सोडण्यात येणाऱ्या बस वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. आगारासाठी आलेल्या १३ नवीन बस लांब पल्ल्याच्या मार्गांवर चालविल्या जातात, तर जुन्या लालपरी स्थानिक फेऱ्यांसाठी वापरल्या जातात. लालपरी आणि शिवशाही बस कार्लेखिंड व सागाव परिसरात बंद पडत असल्याच्या तक्रारीही प्रवाशांनी केल्या आहेत.
स्थानकातील समस्यांतही वाढ
अलिबाग बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन होऊन आठ वर्षे उलटली तरी कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे अस्वच्छता, बस वेळेवर न सुटणे आणि अचानक फेऱ्या रद्द होणे अशा समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील कामगार, महिला आणि विद्यार्थ्यांना बसत आहे.
अलिबाग आगाराचे व्यवस्थापक राकेश देवरे यांनी सांगितले की, उष्णतेमुळे बसमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील काही रस्त्यांची कामे सुरू असल्याने बसफेऱ्या तात्पुरत्या बंद केल्या आहेत. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर या फेऱ्या नियमित सुरू करण्यात येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.