भिवंडी, ता. ३ (बातमीदार) : शहरातील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी भिवंडी महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. बांधकामांमुळे होणारी धूळ, राडारोड्याची अयोग्य विल्हेवाट, कचरा जाळणे आणि मोकळ्या जागांवर बेकायदेशीरपणे कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेने तीन टप्प्यांचा कृती आराखडा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ''ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन'' (ग्राप) लागू करण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रथम नोटीस, त्यानंतर दंड आणि गंभीर प्रकरणांत काम बंद करण्याचे आदेश दिले जाणार आहेत.
उपायुक्त (पर्यावरण) बाळकृष्ण क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कृती आराखड्यांतर्गत तीन स्तरांवर कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बांधकाम व्यावसायिक, विकसक, कंत्राटदार आणि संबंधित मालमत्ताधारकांना लेखी नोटीस देऊन ठराविक कालावधीत त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले जातील. बांधकामस्थळी हिरवी जाळी लावणे, धूळ पसरू नये यासाठी अडथळे उभारणे आणि नियमित पाणी शिंपडणे यांसारख्या उपाययोजना बंधनकारक असतील.
नोटीस देऊनही नियमांचे पालन न केल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्थांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. आवश्यकतेनुसार उत्खनन किंवा पाडकामाची कामे थांबविण्याची नोटीस दिली जाईल. तसेच, राडारोडा उचलण्यासाठी महापालिकेला येणारा खर्च संबंधित जबाबदार व्यक्तींकडून वसूल केला जाणार आहे.
वारंवार उल्लंघन केल्यास काम बंद
प्राथमिक कारवाईनंतरही वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, गंभीर प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या तसेच उघड्यावर कचरा जाळणाऱ्या किंवा मोठ्या प्रमाणावर बेकायदा कचरा टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये संबंधित काम तातडीने थांबविणे, परवाने निलंबित करण्याची शिफारस करणे, प्रकरण संबंधित विभागांकडे सोपविणे आणि कायदेशीर कारवाई सुरू करणे यांचा समावेश आहे. बांधकाम साहित्याची वाहतूक करताना ते पूर्णपणे झाकून नेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास तिसऱ्या टप्प्यात काम बंद करण्याचे आदेश दिले जातील.
नागरिकांना नियमपालनाचे आवाहन
वायुप्रदूषण नियंत्रणासाठी नागरिक, व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांनी उघड्यावर कचरा किंवा बांधकाम साहित्य जाळू नये. बांधकामातून निर्माण होणारा राडारोडा केवळ अधिकृत ठिकाणीच टाकावा. बांधकाम साहित्याची वाहतूक करताना ते पूर्णपणे झाकून न्यावे. तसेच, रस्ते, सार्वजनिक जागा आणि मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पथकांमार्फत नियमित तपासणी
नियमांचे पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी विभागीय अधिकारी आणि विशेष पथकांमार्फत नियमित तपासणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांची नोंद ठेवून त्यांची पुन्हा तपासणी केली जाईल. त्यामुळे शहरातील वायुप्रदूषण नियंत्रणात आणण्यास मदत होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.