मालक-भाडेकरूमध्ये
भरपाईचे समान वाटप करा !
‘सिद्धिविनायक’ जमीनप्रकरणी न्यायालयाचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : प्रभादेवीस्थित श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्याससाठी संपादित जमिनीच्या भरपाईपोटी मिळालेली १०.९४ कोटी रुपयांची रक्कम जमीनमालक आणि दीर्घकालीन भाडेकरू सदानंद गॅरेजमध्ये सम प्रमाणात देण्याचे आदेश मंगळवारी (ता. ३) उच्च न्यायालयाने दिले.
विशेष भूसंपादन अधिकाऱ्याने रेडीरेकनर दराच्या आधारे केलेले मूल्यमापन न्या. अमित बोरकर यांच्या एकलपीठाने फेटाळले. भाविकांसाठी प्रतीक्षा कक्ष आणि भक्त निवास बांधण्यासाठी राज्य सरकारने ही जमीन संपादित केली. १९ सप्टेंबर २००२ च्या बाजारभावानुसार ६४२.९८ चौरस मीटर भूखंडाचे मूल्य १,७०,२०० रुपये प्रति चौरस मीटर निश्चित केले. जमीन अधिग्रहण कायद्याच्या कलम २३ अंतर्गत खुल्या बाजारभावाचे मूल्य निश्चित करण्यासाठी कोणताही आधार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. परिसरातील तत्सम मालमत्तांच्या प्रत्यक्ष नोंदणीकृत व्यवहारांचा आधार घेऊन जमिनीचे मूल्य निश्चित केले आणि जमिनीसाठी १०.९४ कोटी रुपयांची भरपाई निश्चित केली. जमिनीवरील बांधकामे आणि झाडांसाठी मालकांना स्वतंत्रपणे ३.८५ लाख रुपये देण्याचे आदेश दिले.
रकमेच्या वाटपावरून जमीनमालकांनी संपूर्ण भरपाईची मागणी केली, तर सदानंद गॅरेजने १९७१ पासून जमिनीवर ताबा असल्याचे सांगून ७५ टक्के वाटा मिळण्याची मागणी केली होती. तथापि, सदानंद गॅरेजने आपली कायदेशीर भाडेकरू म्हणून स्थिती आणि व्यावसायिक ताबा सिद्ध केला असला, तरी संपूर्ण खुल्या भूखंडावर त्यांचा मालकी हक्क किंवा कायमस्वरूपी भाडेपट्टा असल्याचे ते सिद्ध करू शकले नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले. प्रकरणातील वस्तुस्थिती पाहता, भरपाईची रक्कम समान प्रमाणात वाटून घेणे योग्य ठरेल, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.