गंगावाडीत सांडपाणी साचल्याने आरोग्याचा प्रश्न
विभागप्रमुख सुरेश पाटील, नगरसेविका स्वरूपा पाटील यांच्याकडून पाहणी
घाटकोपर, ता. ४ (बातमीदार) ः घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील गंगावाडी क्रमांक २ येथे अपूर्ण असलेल्या रस्ता कटिंग आणि नाल्याच्या अपूर्ण कामामुळे परिसरात सांडपाणी साचून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येची गंभीर दखल घेत शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख सुरेश पाटील आणि नगरसेविका स्वरूपा पाटील यांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांसह या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली.
गंगावाडी क्रमांक २ येथे रस्ता कटिंगचे काम अपूर्ण असल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी, परिसरात घाण पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना डेंगी, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न लक्षात घेता, अपूर्ण रस्ता कटिंगचे काम तातडीने पूर्ण करून परिसरातील सांडपाणी श्रेयस सिग्नलच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या नाल्याला जोडणे आवश्यक असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
हा रस्ता आणि नाल्याचे काम मुंबई महापालिका व एमआरआयडीसीएल यांच्या अखत्यारीत येत असल्याने दोन्ही यंत्रणांनी समन्वय साधून काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची जबाबदारी स्वीकारून रस्ता कटिंग पूर्ण करणे आणि सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी मोठ्या नाल्याला जोडणी देण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या पाहणीप्रसंगी पालिका अभियंते वैभव कांबळे, महेश नाईक, शाखाप्रमुख संजय कदम, यशवंत ठाकूर आदी उपस्थित होते.
घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील रस्ता कटिंग आणि नाल्याचे काम अर्धवट झाले आहे. त्यामुळे गंगावाडी येथील नाल्यात गटाराचे पाणी साचून राहते. त्यामुळे डास, मच्छर यांचा प्रादुर्भाव वाढून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. हा अर्धवट नाला पूर्ण करून श्रेयस नाल्याशी जोडावा, अशी मागणी आम्ही केली आहे.
- सुरेश पाटील, विभागप्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.