मुंबई

उरणच्या लाटांवर स्वार होऊन युवा ऑलिंपिकची झेप

CD

उरणच्या लाटांवर स्वार होऊन युवा ऑलिंपिकची झेप
१४ वर्षांच्या प्रियांशी पाटीलची प्रेरणादायी यशोगाथा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : समुद्राच्या उत्तुंग लाटांशी खेळण्याचे धाडस, उराशी बाळगलेली ऑलिंपिक पदकाची स्वप्ने आणि कौटुंबिक परिस्थितीशी दिलेली झुंज, या सर्वांचा संगम म्हणजेच उरणच्या केगाव-दांडा येथील अवघ्या १४ वर्षांची प्रियांशी पाटील. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत कुठल्याही व्यावसायिक प्रशिक्षकाविना स्वतःच्या कौशल्याच्या आणि जिद्दीच्या जोरावर प्रियांशीने दक्षिण आफ्रिकेतील सेनेगल (डकार) येथे होणाऱ्या आगामी युवा ऑलिंपिक स्पर्धेत विंडसर्फिंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची अभूतपूर्व किमया करून दाखवली आहे. कामगार नेते महेंद्र घरत यांनी प्रियांशी हिला शुभेच्छा दिल्या आहेत.
उरण-बोरी येथील रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये नववीत शिकणारी प्रियांशी एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आहे. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने खेळासाठी लागणारा प्रचंड खर्च, स्पर्धांचे शुल्क आणि प्रवासाचा भार पेलणे पाटील कुटुंबासाठी आव्हानात्मक होते. मात्र, प्रियांशीच्या आई-वडिलांनी आपल्या लेकीच्या स्वप्नांसाठी जीवाचे रान केले. एक उत्तम जलतरणपटू असलेल्या प्रियांशीने कोणतीही महागडी अकॅडमी किंवा प्रशिक्षक नसताना केवळ आत्मविश्वासाने आणि लाटांच्या आव्हानाला सामोरे जाण्याच्या वृत्तीने विंडसर्फिंगमध्ये देशात स्वतःचे नाव कोरले. प्रियांशीच्या या प्रवासात महेंद्र घरत हे तिच्या पाठीशी ढाल बनून उभे राहिले. जेव्हा जेव्हा प्रियांशीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, तेव्हा महेंद्रशेठ यांनी तिला मोलाचे आर्थिक व नैतिक सहकार्य केले. युवा ऑलिंपिकसाठी रवाना होण्यापूर्वी प्रियांशीने महेंद्र घरत यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी तिचे कौतुक करताना महेंद्र म्हणाले, की भारताला आजपर्यंत युवा ऑलिंपिकमध्ये विंडसर्फिंगमध्ये एकही पदक मिळालेले नाही. प्रियांशी ही जिद्दी आहे, ती समुद्राच्या लाटांसोबत सहज खेळते. ती आम्हा रायगडवासीयांचा अभिमान आहे. ती भारताला नक्कीच पदक मिळवून देईल. माझ्या आई-वडिलांच्या प्रोत्साहनाला आणि महेंद्र घरत यांच्या साथीला तोड नाही. त्यांनी मला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवले नाही. त्यांचे हे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही आणि देशाचे नाव जगात उंचावून दाखवेन, असा आत्मविश्वास प्रियांशी हिने व्यक्त केला.

प्रियांशी सुवर्ण घोडदौड
गेल्या अवघ्या वर्षभरात प्रियांशीने १५ राष्ट्रीय आणि तीन आंतरराष्ट्रीय पदके पटकावून संपूर्ण क्रीडा जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. तिची आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही प्रमुख कामगिरी सुरूच आहे. नोव्हेंबर २०२५मध्ये तिने एशियन चॅम्पियनशिप, थायलंड या ठिकाणी रौप्यपदक पटकावले. २०२५ला सिंगापूर इंटरनॅशनल ओपन विंडसर्फिंग या ठिकाणी कांस्यपदक पटकावले; तर जुलै २०२६ला युरोप या ठिकाणी झालेल्या युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदवला. ऑगस्ट २०२६ मध्ये मलेशिया येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप ४ ते ८ ऑगस्टदरम्यान स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. याच वर्षी विंडसर्फिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये टॉप १०मध्ये स्थान पटकावले. प्रियांशी ही २०२५ आणि २०२६ मधील सलग डबल एशियन मेडलिस्ट तसेच नॅशनल गोल्ड मेडलिस्ट ठरली आहे.

देशाच्या आशा-आकांक्षा प्रियांशीच्या खांद्यावर
महाराष्ट्रातून अत्यंत कमी वयात युवा ऑलिंपिक गाठणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. एका छोट्याशा गावातून निघून थेट जागतिक व्यासपीठावर भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज झालेली प्रियांशी ही केवळ रायगडचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशाची शान बनली आहे. लाटांनाही स्वतःच्या तालावर नाचवणाऱ्या या १४ वर्षांच्या मुलीकडून आता संपूर्ण देशाला युवा ऑलिंपिकमधील पहिल्यावहिल्या विंडसर्फिंग पदकाची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: मुख्य निवडणूक आयुक्तांना मिळणारे अमर्याद कायदेशीर संरक्षण आता जाणार की राहणार? सर्वोच्च न्यायालयाची...

WPL 2027 चे वेळापत्रक जाहीर! MI vs RCB सामना कधी? मुंबई अन् बडोद्यात रंगाणार सामने

Ambegaon Farmers: आंबेगावातील ११०१ शेतकऱ्यांना मोठा आधार! २ हजार ९५ किलो देशी बियाण्यांचे मोफत वाटप

Pali News: पालीकरांचा नगरपंचायतीवर संघर्ष मोर्चा! आधी विकासाचा हिशेब द्या, मगच घरपट्टी वाढवा; नागरिक आक्रमक

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

SCROLL FOR NEXT