वाशी चौपाटीच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव
सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव मंजुरीसाठी; नागरिकांना आधुनिक सुविधांची अपेक्षा
वाशी, ता. ४ (बातमीदार) : नवी मुंबईकरांचे आकर्षण असलेल्या वाशी सेक्टर १० अ येथील जुहू चौपाटीचा चेहरामोहरा बदलण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. चौपाटीच्या सुशोभीकरणासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव कामकाज पूरक तदर्थ समितीने सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी ठेवला आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
वाशी सेक्टर १० अ येथील जुहू चौपाटीवर दररोज मोठ्या संख्येने नागरिक येतात. परिसरातील नागरिकांसाठी हे ठिकाण विरंगुळ्याचे केंद्र बनले आहे, मात्र सध्या बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. सुशोभीकरणाच्या माध्यमातून लहान मुलांसाठी सुरक्षित खेळण्याची जागा, महिलांसाठी आवश्यक सुविधा, दिव्यांगांसाठी सुलभ मार्ग, व्यायाम आणि योगाभ्यासासाठी स्वतंत्र जागा विकसित करण्याची अपेक्षा आहे.
समुद्राचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी आकर्षक बैठक व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी बाके, सावलीसाठी वृक्ष, पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे आणि कचरापेट्यांची व्यवस्था आवश्यक आहे. नुकत्याच या परिसरात एका तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुरेशी विद्युत रोषणाई आणि सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची गरजही व्यक्त होत आहे.
पर्यावरण रक्षणालाही प्राधान्य
सुशोभीकरण करताना किनारपट्टीचे नैसर्गिक स्वरूप आणि पर्यावरणाचे संरक्षण राखणे आवश्यक आहे. सल्लागार नियुक्तीनंतर प्रत्यक्ष कामांचे स्वरूप, आवश्यक निधी आणि काम पूर्ण करण्याची मुदत स्पष्ट होणार आहे. आराखडा तयार करताना स्थानिक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नियमित फेरफटका मारणाऱ्यांच्या सूचना विचारात घेणे गरजेचे आहे. केवळ सौंदर्यवृद्धी न करता सुरक्षितता, स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांना प्राधान्य दिल्यास चौपाटी अधिक उपयुक्त ठरू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.