सीवूड्समध्ये स्थानकाबाहेर मुदतबाह्य औषधांच्या स्ट्रिप्स
दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
नेरूळ, ता. ४ (बातमीदार) : सीवूड्स रेल्वे स्थानकासमोरील श्री अंबिका निवास सोसायटीजवळ सोमवारी मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे रस्त्यावर फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी हजाराहून अधिक औषधांच्या स्ट्रिप्स आढळल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. वैद्यकीय कचऱ्याची नियमबाह्य विल्हेवाट लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रुग्णालये, औषध दुकाने आणि दवाखान्यांमधून निर्माण होणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. मात्र, सीवूड्स परिसरात मुदतबाह्य औषधे थेट रस्त्यावर टाकण्यात आल्याने नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. या औषधांमध्ये मधुमेह, सर्दी-खोकला, आम्लपित्त, कॅल्शियम, पचन आणि सांधेदुखीवरील औषधांचा समावेश आहे. मेटफॉर्मिन, ग्लायड एमएफ, डोम्पेरिडोन, पॅन्टीन यांसह विविध औषधांच्या स्ट्रिप्स आढळल्या. काही औषधांची मुदत २०२३, तर काहींची २०२४ मध्ये संपली आहे.
आरोग्यविषयक धोका वाढला
परिसरात बेघर व्यक्तींचा वावर असल्याने रस्त्यावर पडलेली औषधे कोणी वापरल्यास त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा कोणी आणि कुठून आणून टाकला, याचा शोध घेणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. तसेच या प्रकरणाची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांना द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.