शहापूर, ता. ४ (वार्ताहर) : पावसाच्या खंडामुळे पिकांचे झालेले नुकसान, शेतमालाला मिळणारा कमी भाव आणि वाढती महागाई यामुळे यंदा शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील दिवाळी खरेदीवर मर्यादा आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाल्याने बाजारपेठेतील उलाढाल मंदावली आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीचा विचार करून नागरिकांकडून काटकसरीने खरेदी केली जात असली, तरी उपलब्ध परिस्थितीत दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्व धरणे भरली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेक भागांतील पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. पाण्याअभावी उत्पादनात घट झाली असून, शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नावर पाणी फेरले गेले आहे. त्यातच शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतमालाच्या विक्रीतून ग्रामीण बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. यंदा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने ही उलाढाल कमी झाली आहे. सणासुदीच्या खरेदीचे नियोजन करताना नागरिकांना आर्थिक परिस्थितीचा विचार करावा लागत आहे. तरीही दिवाळीच्या खरेदीतून व्यवसायाला काही प्रमाणात चालना मिळेल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. आर्थिक परिस्थितीचा विचार करून काटकसरीने; मात्र उत्साहाने दिवाळी साजरी करण्याकडे ग्रामीण नागरिकांचा कल दिसत आहे.
आवश्यक खरेदीला प्राधान्य
दिवाळीनिमित्त कपडे, मिठाई, फराळाचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र, महागाई आणि घटलेल्या उत्पन्नामुळे ग्राहकांकडून खरेदीचे काटेकोर नियोजन केले जात आहे. केवळ आवश्यक वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. कपडे, मिठाई, फराळाचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीवरही नागरिकांनी हात आखडता घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.