मुंबई

खोपटा पूल दिवाळीत वाहतुकीसाठी खुला!

CD

खोपटा पूल दिवाळीत वाहतुकीसाठी खुला!
दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात; अत्याधुनिक तंत्रज्ञानाने काँक्रीटीकरण पूर्ण
उरण, ता. ४ (बातमीदार) : उरण तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या जुन्या खोपटा पुलाच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद असलेल्या या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, काँक्रीट पूर्णपणे सेट झाल्यानंतर दिवाळीत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांवरून लांबचा वळसा घालावा लागणाऱ्या उरणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

१९९५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेला हा पूल उरणच्या पूर्व आणि पश्चिम भागांमधील दळणवळणाचा महत्त्वाचा दुवा आहे. गेल्या काही वर्षांत या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुलाच्या संरचनेवर ताण निर्माण झाला होता. पुलाच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या संरचनात्मक तपासणीत अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचे आणि बेअरिंग्ज खराब झाल्याचे आढळले. त्यामुळे पुलाची दुरुस्ती आणि मजबुतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या दुरुस्तीचे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक ठरले. पुलाच्या बांधकामावेळी वापरण्यात आलेली जुनी बेअरिंग्ज सध्याच्या बाजारात उपलब्ध नसल्याने ती नव्याने तयार करून घ्यावी लागली. पुलाची क्षमता वाढविण्यासाठी तडे गेलेल्या भागांवर ग्रूव्ह कटिंग करून इपॉक्सी, ग्राउट इपॉक्सी, कार्बन लॅमिनेट आणि फायबर रॅपिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. याशिवाय पुलावरील चार सेंट्रल हिंज बेअरिंग्ज आणि आठ रोलर रॉकर बेअरिंग्ज बदलण्यात आल्या आहेत. जुन्या रेलिंग काढून नव्या रेलिंग बसविण्यात आल्या आहेत.

सध्या काँक्रीट सेट होण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी आवश्यक कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुलावरून वाहतूक सुरू करता येणार आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. पुलाचे उर्वरित कामही अंतिम टप्प्यात असल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर पूल सुरू करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयारी करण्यात येत आहे.

खोपटा पूल सुरू झाल्यानंतर उरणच्या पूर्व आणि पश्चिम भागांतील नागरिक, कामगार, व्यावसायिक तसेच अवजड वाहनचालकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. पर्यायी मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून पुलाच्या दुरुस्तीची प्रतीक्षा करणाऱ्या उरणकरांना दिवाळीत मोठी भेट मिळणार आहे.


भारतातील मोजक्या तीन ठिकाणी वापरलेले तंत्रज्ञान
या पुलाच्या दुरुस्तीतील सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यूएचपीसी-एफआरसी (अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स्ड काँक्रीट) या अत्याधुनिक काँक्रीटचा वापर. अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असलेल्या या विशेष काँक्रीटचा वापर देशात मोजक्या तीन ठिकाणी करण्यात आला आहे. त्यामध्ये मुंब्रा, पुणे आणि आता खोपटा पुलाचा समावेश आहे. मलेशियन तंत्रज्ञानावर आधारित या काँक्रीटमध्ये सिमेंट आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. त्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी काँक्रीट तयार करताना तापमान नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी बर्फाचा वापर करून रात्रीच्या वेळी काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले. पुलाच्या एकूण २६८ मीटर लांबीचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे.

कोट
पुलाच्या दुरुस्तीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. काँक्रीट सेट होण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिवाळीत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
- दामोदर पाटील, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण


चौकट
महत्त्वाचे टप्पे
- २६८ मीटर लांबीचे काँक्रीटीकरण पूर्ण
- चार सेंट्रल हिंज आणि आठ रोलर रॉकर बेअरिंग्ज बदलल्या
- कार्बन लॅमिनेट, फायबर रॅपिंग आणि इपॉक्सी तंत्रज्ञानाचा वापर
- जुन्या रेलिंगऐवजी नवीन रेलिंग बसविल्या
- काँक्रीट सेट झाल्यानंतर दिवाळीत पूल वाहतुकीसाठी खुला होणार

------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mixed Gender Cricket Tournament : क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! मुलं आणि मुली खेळणार एकाच टीममधून; 'हा' नवा विचित्र नियम पाहून चक्रावून जाल!

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा! किनीतील आंदोलनामुळे कोगनोळीत ट्रकच्या लांबच लांब रांगा

Agniveers Extension: अग्निवीरांना दोन वर्षांची मुदतवाढ! कायम लष्करी सेवेत सामील होण्याची पुन्हा संधी मिळणार

IND vs NZ: 'चेस मास्टर' विराटचा वाढदिवसाआधीच धुमाकूळ! सचिन - पाँटिंगला मागे टाकत रचले तीन वर्ल्ड रेकॉर्ड

Mangalwedha Farmers: दिवाळीपूर्वी मंगळवेढ्यातील ६९ हजार शेतकऱ्यांना दिलासा; खात्यावर ३४ कोटी ६३ लाख जमा, ८ हजार अजून प्रतीक्षेत!

SCROLL FOR NEXT